उत्तम आरोग्यासाठी पूर्ण झोप गरजेची, काेरोनाने वाढविली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:49+5:302021-06-28T04:20:49+5:30
गोंदिया : मागील दीड वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशात अनेकांचा रोजगार गेला, उद्योगधंदे ठप्प पडले. यातूनच कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची ...
गोंदिया : मागील दीड वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशात अनेकांचा रोजगार गेला, उद्योगधंदे ठप्प पडले. यातूनच कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची चिंता या सर्व कारणामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. याचेच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. दिवसभर घरी राहावे लागत असल्याने सर्वाधिक वेळ मोबाईल व टीव्ही पाहण्यात जात आहे. यामुळे लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये चिडचिडपणा वाढला आहे. तर नवीन आजार नवीन प्रश्न निर्माण होत आहे. मात्र उत्तम आरोग्यासाठी पूर्णवेळ झोप ही गरजेची असल्याचा सल्ला डॉक़्टर देत आहेत. झोपेसाठी कालावधी ठरला असून या कालावधीत झाेप झाल्यास मन प्रसन्न राहते तसेच शरीरदेखील पूर्ण क्षमतेने काम करते. झोप न येण्याची विविध कारणेदेखील असू शकतात. अनेकजण चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र त्याचे आपल्या आरोग्यावर पुढे जाऊन फार परिणाम होतात. अति चंचलता, थकवा, मानसिक संतुलन बिघडणे, घाबरल्यासारखे होणे आदी समस्या पूर्ण झोप न झाल्यामुळे निर्माण होते. शिवाय झोपेचा थेट सबंध हा आपल्या पचनक्रियेशी आहे. त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. कुठलीही चिंता न बाळगता निवांतपणे झोप घेण्याची गरज आहे.
...............
झोप कमी झाल्याचे परिणाम
- पूर्ण झोप न झाल्यास नैराश्याची भावना वाढते.
- पचनक्रियेवर परिणाम होऊन आरोग्य बिघडते.
- मधुमेह, उच्च रक्तदाब या सारखे आजार बळावतात.
- मन स्थिर न राहता चिडचिडपणा वाढतो.
- कामात मन लागत नाही.
....................
झोप का उडते
- नियमित असलेल्या झोपेच्या वेळेत न झोपता उशिरापर्यंत मोबाईल व टीव्ही पाहत राहणे, केव्हाही चहा-कॉफीचे सेवन करणे, उशिरापर्यंत जागरण करणे.
- खूप जास्त जेवण करणे, जेवण केल्यानंतर लगेच झोपणे, झोपण्याच्या तीन तासांपूर्वी जेवण झाले तर ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते, शिवाय यामुळे पचनक्रियादेखील चांगली राहते.
- झोप न येण्याची विविध कारणे असू शकतात. यात प्रामुख्याने एखाद्या गोष्टीची चिंता, उदासीनता, व्यसनाधीनता, आजारपण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा नात्यातील दुरावा यामुळे झोप उडते.
................
नेमकी झोप किती हवी
नवजात बाळ १८ ते २२ तास
एक ते पाच वर्ष १८ ते २० तास
शाळेत जाणारी मुले ८ ते १० तास
२१ ते ४० ६ ते ८ तास
४१ ते ६० ६ ते ८ तास
६१ पेक्षा जास्त १०.......................... ते १२..................................... तास
.................................
- झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार करून मन प्रसन्न ठेवल्यास चांगली झोप लागते.
- आंघाेळ करून झोपल्यास उत्तम झोप लागते.
- बदाम, केळी, दूध झोपण्यापूर्वी घेतल्यास झोप चांगली लागते.
- पुस्तकांचे वाचन, संगीत हेदेखील चांगली झाेप येण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
.................
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नकोच
- बरेच झोप लागत नसल्यामुळे झोपेच्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र पुढे याची त्यांना सवय लागून त्याचे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतात.
- झाेपेच्या गोळ्यांचा वापर करणे हे आरोग्यासाठी चिंताजनक बाब आहे. याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होऊन आपली कार्यक्षमतादेखील कमी होते. त्यामुळे स्वत:च केव्हाही झोपेच्या गोळ्यांचे सेवन करू नये.
.......................
कोट :
आजारी व्यक्तीलाही चांगली झोप लागली तरच शरीराची झालेली झीज भरून काढता येते. आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवायचे असेल तर पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे चिंता किवा सतत तेच तेच विचार करणे बंद केला पाहिजे व मानसिक ताण दूर करण्याची गरज आहे.
- डॉ. लोकेश चिरवतकर
......................
पूर्ण झोप झाली तर शरीरदेखील पूर्ण क्षमतेने काम करते. यामुळे शरीरातील अनेक व्याधीदेखील दूर होतात. यासाठी पूर्ण झोप ही महत्त्वपूर्ण आहे.
- डॉ. सुवर्णा हुबेकर