समाजाच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज!
By admin | Published: February 8, 2017 01:06 AM2017-02-08T01:06:17+5:302017-02-08T01:07:43+5:30
समाजाच्या सर्व क्षेत्रातील विकासात्मक प्रगतीसाठी सर्व तेली समाज बांधवांनी एकत्र येऊन विचारमंथन करुन
गडगेकर महाराजांचे प्रतिपादन : तालुकास्तरीय तेली समाज मेळावा
देवरी : समाजाच्या सर्व क्षेत्रातील विकासात्मक प्रगतीसाठी सर्व तेली समाज बांधवांनी एकत्र येऊन विचारमंथन करुन समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करावा असे प्रतिपादन शिवाचार्य महास्वामी गडगेकर महाराज यांनी केले.
विदर्भ तेली समाज महासंघाच्यावतीने आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तालुकास्तरीय तेली समाज मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र तेली महासभा पूर्व विदर्भ अध्यक्ष सुभाष घाटे, स्वागताध्यक्ष म्हणून जिला अध्यक्ष आनंद कृपाण, झामसिंग येरणे तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुमन बिसेन, तेली समाज तालुकाध्यक्ष भास्कर धरमशहारे, नगरसेवक नेमीचंद आंबीलकर, माया निर्वाण, कांता भेलावे, खरेदी-विक्री संघाच्या सभापती पारबता चांदेवार, पं.स.सदस्य गणेश सोनबोईर, देवरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैय्यालाल चांदेवार, उपाध्यक्ष प्रभाकर निर्वाण, युवा कार्यकारिणी अध्यक्ष अॅड. पुष्पकुमार गंगभोईर, श्रीहरी चांदेवार, हंसराज चंदनमालागार आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष अतिथी घाटे यांनी, समाजाची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकत समाजासाठी थोडा तरी वेळ प्रत्येकाने दयावा असे मत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतीक स्पर्धांमधील विजेत्यांना व शालांत व माध्यमिक परीक्षेत प्राविण्यासह गुणांकन प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर समाजातीलच चांदेवार कुटुंबातील मुलीचा विवाहसोहळा समाजाच्यावतीने पार पडला. संचालन इंजि. घनश्याम निखाडे व प्रा.सुषमा चांदेवार यांनी केले. प्रास्ताविक सचिव राजेश चांदेवार यांनी मांडले. आभार कुलदीप लांजेवार यांनी मानले.