साहित्यातून परिवर्तनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 08:48 PM2019-01-28T20:48:19+5:302019-01-28T20:48:39+5:30
पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : पाचव्या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिसंवादाची एक वेगळीच चर्चा घडून आली. खरे साहित्य हे खेड्या पाड्यातच प्रामुख्याने रुजत आहे. साहित्य समाजाचा आरसा असून समाज प्रबोधनाचे मुख्य कार्य करताना पाहण्यास मिळते. म्हणून साहित्यातून परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
पाचवे परिवर्तनशिल साहित्य संमेलन शनिवारी (दि.२६) पार पडले. या वेळी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. टी.एस. माटे, इंजि. प्रा. संजय मगर, प्रा. अनिल कानेकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. संविधान मुल्यांची जोपासना करणाऱ्या साहित्याची समाजाला गरज आहे. या विषयावर सर्व सहभागी मान्यवरांनी महाचर्चा घडवून आणली. प्रा. माटे म्हणाले, संविधानाच्या आधाराशिवाय माणूस आपली गरज आणि स्वाभीमानाचे जीवन जगू शकत नाही. संविधानच माणसाला मोठे करण्याचे काम करीत आहे. प्रा. मगर म्हणाले संविधानाची मुल्य, अधिकार, कर्तव्ये आणि अभिव्यक्ती ही समाजाच्या प्रत्येक घटकांना तारते. त्यांची रक्षा करते. वंचिताना बोलते, चालते करते.
संविधानाच्या विषयाला हात घालत प्रा. कानेकर म्हणाले सर्व सामान्य माणसाला वर उचलून धरण्याचे आणि कसे जगावे हे शिकविण्याचे काम संविधानाने केले. माणुसकी ही संविधानाशिवाय कोणतेही ग्रंथ शिकवू शकत नाही असे मत व्यक्त केले. खोब्रागडे म्हणाले,संविधानाने समाजाचे परिवर्तन केले.
संविधान हा महान ग्रंथ असून वास्तव माणसाचे सत्य मांडते. प्राचीन काळाच्या सर्व परंपरा बदलवून आज परिवर्तन घडविण्याची ताकद संविधान समाजाला व साहित्याला देत असल्याचे सांगितले. या सत्राचे संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ.माधवी झोडे यांनी मानले.