राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2017 02:09 AM2017-01-07T02:09:44+5:302017-01-07T02:09:44+5:30
विज्ञान व तंत्रज्ञान युक्त प्रेरक जगातील समाजाला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या प्रेरक विचार व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीता
सुखदेव वेठे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव
देवरी : विज्ञान व तंत्रज्ञान युक्त प्रेरक जगातील समाजाला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या प्रेरक विचार व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीता या ग्रंथाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गडचीरोली येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचारक सुखदेव वेठे यांनी केले.
येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखेच्यावतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजीत सामुदायीक ध्यानप्रसंगी ते बोलत होते. दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन तर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, नगरसेवक यादोराव पंचमवार यांच्या हस्ते माल्यार्पण करुन पारबता चांदेवार, नगरसेविका कोकीळा दखने, माया निर्वाण, मुख्याध्यापक विनोद गिऱ्हेपुंजे, बाबूराव क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.
पुढे बोलताना वेठे यांनी, आजच्या तरुणांनी येणाऱ्या भविष्यातील पिढीचा विचार करुन ग्रामगीतेचा अभ्यास करुन आपल्या जीवनात अवलोकन करुन समाजात चांगले विचार देण्याचे कार्य केले पाहिजे. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व थोर महापुरुषांच्या जयंती व स्मृती स्मरण दिवस साजरे करण्यात सार्थक ठरु असे मत वय्क्त केले. यावेळी या महोत्सवाप्रसंगी राष्ट्रीय किर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज यांचे जाहीर किर्तन झाले.
यावेळी काळे महाराज यांनी उपस्थित नगरवासीयांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या सामुदायीक ध्यान व प्रार्थनेचे महत्व सांगत आजच्या नागरिक व युवकांना आवश्यक असलेल्या विचारांवर मार्गदर्शन करुन देशातील दोन संताची ओळख करुन दिली.
त्यामधील पहिला संत देशाच्या सिमेवर अहोरात्र आमची सेवा करणारे वीर जवान व दुसरा संत शेतात राबणारा शेतकरी अशी संतांची ओळख करुन देत वैयक्तीक व गावाच्या विकासासाठी प्रेरक उत्कृष्ट विश्लेषण जाहिर किर्तनाच्या माध्यमातून करुन दिले. तर दुसऱ्या दिवशी सामुदायीक प्रार्थना व बक्षीस वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, माजी आ.रामरतन राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सहेषराम कोरोटे, मनोज भुरे उपस्थित होते.
प्रास्ताविक मंडळाचे सल्लागार डॉ. गुरु कापगते यांनी मांडले. संचालन ओमप्रकाश रामटेके व कुलदीप लांजेवार यांनी केले. आभार सहसचिव नरहरी लांजेवार यांनी मानले. महोत्सवाच्या आयोजनाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष तु.को.राणे, उपाध्यक्ष रामचंद्र राऊत, चंद्रकांत आंबीलकर, युवराज धुर्वे, चंद्रशेखर अगळे, दयाराम बन्सोड, मोरेश्वर मेश्राम, दयाराम लांजेवार, रामदास मांदाडे, मनोज खुरपुडे, रतिराम डोये, निलकंठ आरसोडे, गजानन दिघोरे, दिलीप साखरे, अरुण मानकर, गोपाल चताप, विनोद भिमटे, हर्षवर्धन मेश्राम, शिवम राऊत आदिंनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)