मराठीचे संवर्धन काळाची गरज
By admin | Published: February 29, 2016 01:22 AM2016-02-29T01:22:41+5:302016-02-29T01:22:41+5:30
मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धन करने काळाची मोठी गरज झाली आहे.
तहसीलदार सांगळे यांचे प्रतिपादन : कर्तृत्ववान मराठीजनांचा केला सत्कार
सालेकसा : मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धन करने काळाची मोठी गरज झाली आहे. या साठी सर्वस्तरावर सहकार्य मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी केले. ते सालेकसा येथे शनिवारी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सालेकसा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्ता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत सांगळे तर उद्घाटक म्हणून आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, प्रमुख अतिथी म्हणून विजय मानकर, राजू दोनोडे, गणेश भदाडे, रमेश चुटे, सागर काटखाये, वसतिगृहाचे मुख्याध्यापक एन.डी. पिंगळे, कार्यक्रमाचे संयोजक ब्रजभूषण बैस उपस्थित होेते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला माता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांना ही नमन करण्यात आले. त्यांची जयंती २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन म्हणून साजरी करण्यात आलीे.
याप्रसंगी तहसीलदार सांगळे म्हणाले की, हे आम्हा सर्वांचे सौभाग्य आहे की आम्ही मराठीत जन्मले, मराठीत वावरलो, मोठे झालो. परंतु मध्यंतरी कान्व्हेंट संस्कृती आणि इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढल्याने मराठी भाषेवर अत्याचार करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. परंतु महाराष्ट व महाराष्ट्राबाहेर ही वावरणाऱ्या मराठी माणसाच्या नसानसात मराठी भाषेचा संचार असून ती शाश्वत टिकून राहात आहे. आता आपल्या सर्वांचा सहकार्याने मराठी भाषेचा संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. कारण की मराठीशिवाय आपली संस्कृती जपून ठेवता येत नाही.
कार्यक्रमाचे संयोजन ब्रजभूषण बैस यांनी प्रास्ताविकेतून मराठी भाषा दिनाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीसुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेचे पत्रकार विजय मानकर, राजू दोनोडे, गणेश भदाडे, रमेश चुटे, सागर काटेखाये यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशांत सांगळे यांच्यासह मुख्याध्यापक एन.डी. पिंगळे, सरपंच योगेश राऊत, श्रुती चॅटर्जी व इतर मराठी भाषिक शिक्षकांचे सत्कार करण्यात आला.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आपल्या स्थापनेची शतकी ओलांडलेली मराठी प्राथमिक शाळा आमगाव खुर्द येथील विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभातफेरी काढून मराठीचा अभिमान वाटावा असा जय घोष करण्यात आला. लोकांमध्ये मराठी प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला.
याप्र्रसंगी मुलांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. संचालन व आभार शिक्षक डी.बी.पटले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष ध्रुवकुमार हुकरे, अभय कुरंजेकर, दमाहे, भांडारकर, रहांगडाले, फटे आदी अनेकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)