यशासाठी सहा मूलभूत तत्वांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:51 PM2018-01-02T23:51:33+5:302018-01-02T23:51:43+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अनेक खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असते. समाजातील चांगल्या-वाईट अनुभवांची जाण त्यांच्यासोबत असते. पण विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करुन यशासाठी परीक्षणासह पाच मुलभूत तत्वांचा वापर करुन शैक्षणिक कार्यकाळ पूर्ण केल्यास लक्ष्यपूर्ती होते,
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अनेक खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असते. समाजातील चांगल्या-वाईट अनुभवांची जाण त्यांच्यासोबत असते. पण विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करुन यशासाठी परीक्षणासह पाच मुलभूत तत्वांचा वापर करुन शैक्षणिक कार्यकाळ पूर्ण केल्यास लक्ष्यपूर्ती होते, असे प्रतिपादन साहित्यिक तथा सेवानिवृत्त जिल्हा निबंधक लखनसिंह कटरे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्रेहसंमेलन घेण्यात आले. दरम्यान बक्षीस वितरण सोहळ्यात ते पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य बी.ओ. वासनिक होते. बक्षीस वितरक म्हणून भवभूती शिक्षण संस्थेचे संचालक हरिहर मानकर होते. पाहुणे म्हणून डी.आर. कटरे, रमेश कावळे, इंद्रराज बहेकार, गोविंद खंडेलवाल, उपसपरंच बरकत अली सैयद, हेमराज कोरे, बिसराम बहेकार, प्राचार्य आर.आर. डे, पर्यवेक्षक एच.बी. राऊत, स्नेहसंमेलन प्रभारी एल.बी. मेश्राम, डी.डी. लोखंडे, प्रा.टी.जी. पटेल, एस.जी. पटले उपस्थित होते.
पुढे बोलताना कटरे यांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात ज्ञानप्राप्तीला अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञान प्राप्त करुन भावी जीवन यशस्वी करणे हा मार्ग होय. यश प्राप्तीसाठी सहा मुलभूत तत्वांची गरज असते ही तत्वे म्हणजे परिश्रम, निष्ठा, संयम, विवेक, नैतिकता व गणितीय वृत्ती हे होत. या सहा मूलभूत तत्वांचा आधार घेऊन विद्यार्थी यशोशिखर गाठू शकतो व भावी जीवन समृद्ध करु शकतो, असे सांगीतले.
भवभूती शिक्षण संस्थेचे संचालक, माजी पंचात समिती सभापती तथा बक्षीस वितरक हरिहर मानकर यांनी, परिश्रमातून मिळविलेले यशचं खरे यश असते. जीवनात अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरू नये. पहिल्यापेक्षा अधिक परिश्रम घेवून यश मिळवावे, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य भाऊराव वासनिक यांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात पालक, शिक्षक व विद्यार्थी हे तिन्ही घटक महत्वाचे आहेत. यात शिक्षकाची भूमिका ही संयमशील व विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना मांडून शिकविण्याची असावी, असे मत व्यक्त केले.
या वेळी हरिहर मानकर व कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते स्नेह संमेलनांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे आभार प्रा.टी.जी. पटेल यांनी मानले.