पर्यावरण हित जोपासण्यासाठी सृष्टिचक्र टिकविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:19+5:302021-06-05T04:22:19+5:30
विजय मानकर सालेकसा : सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोच की, स्वत:ची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाला साथ ...
विजय मानकर
सालेकसा : सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोच की, स्वत:ची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाला साथ देणे गरजेचे आहे. तुलसी रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिले आहे, ‘क्षिती जल पावक गगन समीरा... पंच रचित अधि अधम शरीरा.’ अर्थात आपले शरीर निसर्ग प्रदत्त पाच तत्त्वांवर अवलंबून आहे. यात पृथ्वी, पाणी, अग्नी, आकाश आणि हवा यांचा समावेश ही वस्तू मानवाला पर्यावरण प्रदत्त असून, या पर्यावरणाचे हित जोपासण्यासाठी जल, थल, नभातील सृष्टिचक्र टिकवून ठेवण्याची आज नितांत गरज आहे.
सध्याच्या कोरोनाकाळात ऑक्सिजन वायूची आवश्यकता किती भासली, याचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना आलेला आहे. शरीरात ऑक्सिजनचा स्तर कमी होण्यामागे पर्यावरणाचा ऱ्हास होणे हेदेखील एक प्रमुख कारण आहे. वर्षानुवर्षे आपण आपल्या पर्यावरणाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करीत आहोत. परिणामी पर्यावरणाचे नुकसान होत गेेले. त्यामुळे हे नुकसान थांबविणे ही आजची सर्वांत मोठी गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. मध्य भारतातील गोंडवाना क्षेत्रात वनाच्छादिन पट्ट्याला लागून असलेला सालेकसा तालुक्याचाही एक तृतीयांश भाग पर्यावरणपूरक घटकांनी नटलेला आहे. या क्षेत्रातील भागात दर्जेदार हजारो प्रजातीची वृक्ष, मोठमोठ्या पर्वतरांगा, नद्या, नाले, धबधबे, झरे, गुहे, डोंगर, इत्यादी निसर्गाची किमया अस्तित्वात असून सृष्टिचक्र चालविणारे तृणभक्षी ते मांस भक्षण करणारे सर्वच प्रकारचे प्राणी आणि आकाशाला नेहमी गीतस्वर प्रदान करणाऱ्या विविधरंगी पक्ष्यांचा वास आहे. नदी, नाले, तलावही जैव विविधतेने परिपूर्ण असून सृष्टीचे चक्र सतत गतिमान ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व घटक या तालुक्यातील जंगलात पाहायला मिळतात. या घटकांमुळे आज येथील वने पर्यावरणाला सदैव पोषक ठरत आहेत. तालुक्यात १५ हजार ३२६ हेक्टरवर वनक्षेत्र असून, यामध्ये ४६९१ हेक्टरवर झुडपी जंगल, ४२०७ हेक्टरवर राखीव वन, ५३६० हेक्टरमध्ये संरक्षित वन असून १०६९ हेक्टरवरील वन अवर्गीकृत वनक्षेत्र आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पूर्वी श्रृंखलेत असलेल्या या वनक्षेत्रात उंच पहाडावरून वाहणारा प्रसिद्ध हाजराफाल धबधबा आणि आशिया खंडातील सर्वांत मोठी कचारगड गुंफा आहे. या भागात प्रवेश करताच ऑक्सिजनचा लाभही लोकांना घेता येतो; परंतु त्यांचे शुद्ध अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनीच पर्यावरण संवर्धनाची भावना बाळगण्याची गरज आहे.
................
या पर्यावरण दिनाची संकल्पना
यंदा पर्यावरण दिनाची संकल्पना ‘परिसंस्था पुनर्संचयित असून, या अंतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरणाची रक्षा करीत वाढत्या प्रदूषणाला कमी करणे आणि इकोसिस्टमवरील वाढलेला दबाव कमी करणे हा यामागील उद्देश आहे. पर्यावरणाशी संबंधित विविध विषयघटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
.............
‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त प्रत्येकाने पर्यावरण हित साधण्यासाठी आपल्या स्तरावर सहकार्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. पर्यावरणाला पोषक घटकांचा ऱ्हास होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील असण्याची गरज आहे.
अभिजित इलमकर, वनपरिक्षेत्राधिकारी, सालेकसा