कामगार विरोधी बदलाच्या विरुध्द एकजूट कामगार चळवळीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 12:25 AM2017-06-17T00:25:36+5:302017-06-17T00:25:36+5:30
कामगार वर्गाने एकजुटीच्या अनेक चळवळी केल्यानंतर कामगार हिताचे कायदे करवून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कामगार वर्गाने एकजुटीच्या अनेक चळवळी केल्यानंतर कामगार हिताचे कायदे करवून घेतले. पण केंद्राची सरकार या कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल करुन मालक वर्गाचे हित जोपासत असल्याने कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. या धोरणाच्या विरोधात आयटक लढा देत असून कामगार विरोधी बदलाच्या विरोधात एकजूट कामगार चळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन आयटकचे राज्य अध्यक्ष सुकुमार दामले यांनी केले.
विविध कामगार संघटनाच्या आयटकच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हौसलाल रहांगडाले होते. यावेळी प्रामुख्याने आयटकचे राज्य महासचिव श्याम काले, जिल्हा सचिव मिलींद गणवीर, विवेक काकडे, शेखर कनोजिया, करुणा गणवीर, शालू कुथे, शकुंतला फटींग, कय्यूम शेख उपस्थित होते. या मेळाव्यात २७ सभासदांच्या कार्यकारीणीची निवड करण्यात आली असून मुख्य पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव रामचंद्र पाटील, शेखर कनोजिया, उपाध्यक्ष शकुंतला फटींग, विवेक काकडे, करुणा गणवीर, शालू कुथे, टेकचंद चौधरी, सी.के.ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. अदानी पावर प्लांटमधील कामगार शोषणाचा निषेध करुन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. प्रास्तावीक रामचंद्र पाटील यांनी मांडले.