गरजू लाभार्थ्यांना घरकूल मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 09:47 PM2019-06-18T21:47:38+5:302019-06-18T21:48:51+5:30
प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल योजनेतंर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांना वगळून इतर लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने त्यांची पंचायत समिती कार्यालयात पायपीट सुरुच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल योजनेतंर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांना वगळून इतर लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने त्यांची पंचायत समिती कार्यालयात पायपीट सुरुच आहे. पण यानंतरही त्यांची पंचायत समिती प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने समस्या कायम आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील कोसबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मेंडकी येथील एका गरीब गरजू लाभार्थ्याला घरकुल न मिळाल्याने त्यांना पावसातच दिवस काढावे लागणार आहे. शासनाचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रत्येक गावात गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याची योजना सुरू केली आहे. पण गरजू लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जात नसल्याने त्यांची अडचण होत आहे. तालुक्यातील गट ग्रामपंचायत कोसबी अंतर्गत येत असलेल्या मेंडकी येथील रेवचंद इस्तारी फुंडे यांचे घरकुल योजनेच्या यादीमध्ये ५६ व्या क्रमांकावर नाव आहे. मात्र अनुक्रमांकानुसार गावात २२ व्या क्रमांकाच्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे फुंडे यांचा नंबर लागण्यास पुन्हा वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी यंदाचा पावसाळा फुंडे यांच्या कुटुंबीयांना पावसात काढावा लागणार आहे.
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांचा क्रम तयार केला नसल्याने गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.