मानाकुही तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:07 PM2018-11-10T21:07:49+5:302018-11-10T21:08:31+5:30
तालुक्यातील मानाकुही तलावाच्या मुख्य वितरिकेतून पाण्याची गळती होत असून मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील मानाकुही तलावाच्या मुख्य वितरिकेतून पाण्याची गळती होत असून मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. यावर मनसेच्यावतीने समाधान योजना व जनजागरण शिबिरात मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मानाकुही तलावातील मुख्य वितरिकेतून सतत २ वर्षांपासून पाणी वाहतजात असल्याने संपूर्ण धरण रिकामे होऊन शेतकरी व वन्य प्राण्यांची उन्हाळयात गैरसोय होते. वन्यजीव पाण्याच्या शोधात गावाकडे येऊन गावकºयांना त्रास होऊन शेतीचे नुकसान सुद्धा होत आहे. एकीकडे जलसंधारणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कोट्यवधी रु पये खर्च केले जात आहेत. त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अपव्यय होत आहे. पाटबंधारे उपविभागातर्फे पाठविण्यात आलेल्या एका पत्रानुसार पैशांचा तुटवडा असल्याने संबंधित कार्य करता येत नाही असे कारण पुढे करण्यात आले होते.
तसेच महाराष्ट्र राज्य सचिवालयांच्या पत्रानुसार नागपूर विभागाला लागणाऱ्या रक्कमेची पूर्तता करण्यासाठी तात्काळ कार्यवाहीचे आदेश सुद्धा देण्यात आले होते. परंतु ८ महिने लोटून गेले तरीही संबंधित विभागाचे मानाकुही तलावाकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मनसेने पाण्यासाठी दंड थोपटले असून मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशाला प्रशासनाला दिला आहे. विशेष म्हणजे, सदर तलावाची क्षमता ८५६.३० टीएमसी एवढी असून मागील २ वर्षांपासून पाण्याची गळती सुरु आहे. सालेकसा तालुक्यात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सक्रीय असून कोणत्याही पक्षातर्फे किंवा सामाजिक संस्थांतर्फे पाण्यासाठी आंदोलन केलेले नाही.
अशात मनसेतर्फे समाधान शिबिरात आमदार संजय पुराम, उपजिल्हाधिकारी अशोक लटरे, नायब तहसीलदार भुरे ह्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमगाव तालुक्याचे तहसीलदार साहेबराव राठोड, नगराध्यक्ष वीरेंद्र उईके, पंचायत समिती सभापती अर्चना राऊत, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे उपस्थित होते. निवेदन देताना तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुका उपाध्यक्ष ध्रुवकुमार हुकरे, दिलीप ढेकवार, शहर अध्यक्ष राहुल हटवार, विध्यार्थी सेनेचे गोल्डी भाटिया, स्वप्नील करवाडे, स्वप्नील बोंबार्डे, अश्विन गोस्वामी आणि समस्त मनसैनिक उपस्थित होते.
आमरण उपोषणाचा इशारा
मनसेच्यावतीने जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यावर संबंधीत विभागाने कार्यवाही केली नाही तर पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने त्याची नासाडी करणे हा देशद्रोह असून विभाग व संबंधित अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालविणार आहे. तसेच तालुकाध्यक्ष बैस आणि शहर अध्यक्ष हटवार आमरण उपोषणावर बसणार असल्याची माहिती बैस यांनी दिली.