कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होतेय दुर्लक्ष : पॉझिटिव्हच्या संपर्कातील सहा जणांची चाचणीच होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 05:00 AM2021-04-02T05:00:00+5:302021-04-02T05:00:18+5:30

जिल्ह्यात एका रुग्णामागे ८ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. तर रुग्णसंख्या वाढल्याने आता हे प्रमाण एका रुग्णामागे १५ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, खासगी प्रयोगशाळांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याने ट्रेसिंग करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

Neglecting contact tracing: Six positive contacts not tested | कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होतेय दुर्लक्ष : पॉझिटिव्हच्या संपर्कातील सहा जणांची चाचणीच होत नाही

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होतेय दुर्लक्ष : पॉझिटिव्हच्या संपर्कातील सहा जणांची चाचणीच होत नाही

Next
ठळक मुद्देबाधित रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ :टेस्टचे प्रमाण वाढले, आरोग्य विभागाचे नियोजन ढासळले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दीड हजारावर गेला. बाधितांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले. मात्र ट्रेसिंग फार कमी प्रमाणात होत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होत असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात एका रुग्णामागे ८ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. तर रुग्णसंख्या वाढल्याने आता हे प्रमाण एका रुग्णामागे १५ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, खासगी प्रयोगशाळांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याने ट्रेसिंग करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाच ते सहा जणांची चाचणी होत नसल्याने ते इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा तीन आकडी पाढा सुरू झाला आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंगवर भर देण्याची गरज आहे. 
 

दररोज दीडशे जण पॉझिटिव्ह, चाचण्यांच्या संख्येत वाढ 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, दररोज दोन हजारांवर चाचण्या होत आहेत. यातील किमान दीडशे जण दररोज पॉझिटिव्ह येत आहेत. 
कोरोनाबाधितांचा वाढता ग्राफ लक्षात घेता आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण एका रुग्णामागे १५ असे करण्यात येऊन त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढल्याने आता ग्रामीण भागातसुद्धा कठोर उपाययोजना आणि टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. 
 

हा घ्या पुरावा
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर गावात एकाच दिवशी तब्बल ३६ रुग्णांची नोंद झाली. यापैकी दोन रुग्ण हे इतरांच्या संपर्कात आले; पण त्यांचे ट्रेसिंग वेळीच न झाल्याने कोरोना संसर्गात वाढ झाली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष केल्याने आणि माहिती लपविल्यानेसुद्धा या ठिकाणी कोरोना संसर्गात वाढ झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे ट्रेसिंगवर अधिक भर देण्याची गरज आहे. 
शहरातील छोटा गोंदिया परिसरातील एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला. या रुग्णाच्या संपर्कात २० ते २५ जण आले. पण, त्यापैकी सात ते आठ जणांचीच कोरोना चाचणी करण्यात आली. संपर्कात आलेल्या उर्वरित १० ते १२ जणांची चाचणीच करण्यात आली नसल्याचे समजते आहे. परिणामी, कोरोना संसर्गात वाढ होण्यास मदत होत आहे.
 

 

Web Title: Neglecting contact tracing: Six positive contacts not tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.