फसवणुकीचा नवा फंडा: दागिने द्या, डिझाईन पसंत आल्यास पैसे मिळणार
By कपिल केकत | Published: March 7, 2024 08:24 PM2024-03-07T20:24:53+5:302024-03-07T20:25:11+5:30
चार महिलांची १.१६ लाख रुपयांची फसवणूक
गोंदिया: तुमच्याकडील सोन्याचे दागिने आम्हाला द्या. त्यांचे डिझाईन पसंत आल्यास आमची कंपनी तुम्हाला ४० हजार रुपये देणार असे आमिष दाखवून चार महिलांची एक लाख १६ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कुंभारटोली येथे २९ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादी फुलवंता लिहराम मेश्राम (४०,रा.रिसामा) व त्याच्या बहिणीला अनोळखी महिलेने (४०) तुमच्याकडील दागिने आम्हाला द्या. आमच्या कंपनीत ऑफर सुरू असून दागिन्यांचे डिझाईन पसंत पडल्यास दागिने परत दिले जातील व ४० हजार रुपये कंपनी तुम्हाला देणार, असे खोटे आमिष दिले तसेच फिर्यादी त्यांची बहीण व शेजारच्या दोन महिलांकडून सोने-चांदीचे एकूण एक लाख १६ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने घेऊन फसवणूक केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
या दागिन्यांचा आहे समावेश
यामध्ये फिर्यादीची सोन्याची अंगठी, कानातली बिरी व लटकन, सोन्याची बिरी, सोन्याची नथ, सोन्याची ताबिज, सोन्याचे गळ्यातील डोरले, मंगळसूत्र, चांदीची पायल असे एकूण ५९ हजार रुपयांचे दागिने. फिर्यादीच्या बहिणीची सोन्याची अंगठी, सोन्याचे कानातील रिंग, सोन्याचे डोरले, चांदीचे पायातील दोन जोड जोडवे असे एकूण १० हजार ५०० रुपयांचे दागिने. शेजारील महिला क्रमांक-१ चे सोन्याचे मंगळसूत्र व चांदीची पायल असे एकूण १९ हजार रुपयांचे दागिने तर महिला क्रमांक-२ चे सोन्याचे मोठे मंगळसूत्र, लहान मंगळसूत्र व नथ असे एकूण २८ हजार रुपयांचे दागिने होते.