नवीन पिढीच्या महिलांतही वाणाचा ट्रेंड कायम
By admin | Published: January 16, 2016 02:10 AM2016-01-16T02:10:02+5:302016-01-16T02:10:02+5:30
पतीच्या सौभाग्यासाठी सुहासिनी तीळ संक्रातीपासून पाच दिवस वाण वाटतात. लहान मुलांची लूट करतात.
दुरावलेली मने एकत्र येणार : हळदी-कुंकवातून सुहासिनींचा सन्मान
गोंदिया : पतीच्या सौभाग्यासाठी सुहासिनी तीळ संक्रातीपासून पाच दिवस वाण वाटतात. लहान मुलांची लूट करतात. महादेव व माता पार्वती यांच्या पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतिक ठरवित महिला मंडळीही मकरसंक्रातीपासून पाच दिवस वाण वाटतात. शेजारच्या पाजारच्या महिलांना वाणाच्या स्वरूपात विविध वस्तू भेट देऊन त्यांना कुंकू लावतात. शेजारीपाजारी राहणाऱ्या महिला वर्षभर भांडत असल्या तरी या वाणाच्या निमित्ताने एकमेकींना आपल्या घरी बोलावतात.
वाणाच्या स्वरूपात गहू, तांदूळ, भेटवस्तू, तिळगूळ, बोर असे देतात. वाण घेताना वाण देणाऱ्या महिलेचा हात पकडून त्यांना त्यांच्या पतीविषयी उखाणा विचारला जातो. महिला मंडळीही एकापेक्षा एक उखाणा सादर करून आपल्या पतीचे नाव त्या उखाण्यातून घेतात. जूनीच ही परंपरा आजही चालू आहे. विज्ञान युगात या प्रथेला अधिकच महत्व आले आहे. एखादी महिला नोकरी करीत असेल तरी ती वेळ काढून शेजारच्या-पाजारच्या महिलांना वाण वाटते. या वाणाच्या निमीत्ताने अनेक महिला ते उखणा पाठ करण्याची तयारीच आठवडाभर किंवा पंधरवाडाभर करीत असतात. कोणती महिला किती उखाणे सांगते. चांगले व जास्तीत जास्त उखाने सांगणाऱ्या महिलेकडे उपस्थित महिला अधिकच आकर्षीत होतात. प्रत्येक महिला आपला उखाणा इतर महिलांपेक्षा चांगला असावा याचा प्रयत्न करते. मकरसंक्रातपासून वाटणाऱ्या वाणामुळे महिला-महिलांमध्ये असलेला दुरावा कमी होत असतो. (तालुका प्रतिनिधी)
असे वाटतात साहित्य
कुंकूची डबी, चहा गाळणी, पाणी गाळणी, स्टील, प्लास्टीकचे चेंडू, पीठ चाळणी, चमच, गृहउपयोगी विविध साहित्य वाटप केले जाते. वाणासोबत वटाण्याच्या शेंगा, बोर, गाजर, सिंगाडे वाटप केल्या जातात.
आर्थिक उत्पन्नानुसार वाटतात वाण
ग्रामीण किंवा शहरी भाग असो या दोन्ही भागातील महिला वाण वाटतात ते वाण त्यांच्या आर्थिक मिळकतीवरूनही लक्षात येतो. ज्याच्ंयाकडे नोकरी आहे किंवा आर्थिक मिळकत जास्त आहे. त्या घरातील महिला वाणात मोठ्या वस्तू देतात. ज्यांची मिळकत कमी आहे त्याही महिला कुंकूला जास्त महत्व आहे असे म्हणत त्या वाटतात. दोन्ही प्रकारच्या महिला सौभाग्याचे लेणं म्हणून कुंकवाचा वापर करतात.
पतंग व तिळगूळ आजही आकर्षक
मकरसंक्रातच्या निमित्ताने बालक मंडळी पतंग उडविण्याचे काम करतात. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, मित्रमंडळींना या निमीत्ताने तिळगूळ वाटून नास्ता करण्यासाठी बोलावले जाते. जून्या काळापासून आजही तिळगूळाचा कार्यक्रम केला जातो.