कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 04:47 PM2021-12-27T16:47:41+5:302021-12-27T16:53:23+5:30
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे.
गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेेने वाटचाल सुरु असताना आता जिल्ह्यासह राज्यातही पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय लग्न व अन्य सभा समारंभातील उपस्थितीवरही मर्यादा घालण्यात आली आहे.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. याशिवाय दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या विविध समारंभातील उपस्थितीच्या प्रमाणावरही निर्बंध घालण्यात आले आहे. स्थानिक परिस्थिती पाहून या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचे संकेतही जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
असे राहतील निर्बंध
लग्नसोहळे : मंगल कार्यालय किंवा बंदिस्त हॉलमध्ये होणाऱ्या लग्नसोहळ्यात शंभरपेक्षा जास्त उपस्थिती नसावी, तर खुल्या जागेत होणाऱ्या लग्न समारंभात २५० किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्केच उपस्थिती असावी.
राजकीय-धार्मिक कार्यक्रम : सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम बंदिस्त हॉलमध्ये असल्यास तेथेही केवळ शंभर जणांनाच उपस्थित राहता येईल. कार्यक्रम मोकळ्या जागेत घेतल्यास २५० किंवा क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीची मर्यादा राहणार आहे.
क्रीडा स्पर्धा : खेळ, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना मैदानावर किंवा स्टेडियममध्ये प्रेक्षक संख्येच्या २५ टक्केच उपस्थितीची परवानगी आहे.
अन्य कार्यक्रम : राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच लग्न सोहळ्यांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांच्या बाबतीत बंदिस्त सभागृहासाठी ५० टक्के, तर खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी २५ टक्के उपस्थितीची मर्यादा घातली आहे.
हॉटेल, सिनेमा हॉल : हॉटेल, रेस्टॉरंट, योगा सेंटर, स्पा, सिनेमा हॉल आदी ठिकाणी आसनक्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी आहे. या आस्थापनांनी त्यांच्या आसन क्षमतेची माहिती दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे.