जिल्ह्यातील तापमानाने गाठला नवा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:49 PM2019-05-29T23:49:35+5:302019-05-29T23:50:41+5:30
यंदा मे महिन्यातील तापमानाने उच्चांक गाठले आहे. जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मागील २० वर्षांतील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चांगलीच होरपळ होत असून कुलर पंखे सुध्दा काम करीत नसल्याने संपूर्ण जिल्हावासीय उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा मे महिन्यातील तापमानाने उच्चांक गाठले आहे. जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी झाली. मागील २० वर्षांतील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चांगलीच होरपळ होत असून कुलर पंखे सुध्दा काम करीत नसल्याने संपूर्ण जिल्हावासीय उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
मान्सूनचे आगमन लांबल्याने यंदा पावसाळ्याला उशीराने सुरूवात होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे मे महिन्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. जिल्ह्यातील मे महिन्यातील तापमान ४३ अंशापर्यंत गेले होते. मात्र २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तो अंदाज यंदा खरा ठरत आहे. मागील शनिवारपासून जिल्ह्याच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून पारा ४३ अंशावरुन ४५.५ अंशावर पोहचला आहे. मागील पंधरा वीस वर्षांत ऐवढे तापमान पाहिले नसल्याने काही वयोवृध्द नागरिक बोलून दाखवित आहे. तर हवामान विभागाने ३० मे पर्यंत जिल्ह्यात आॅरेंज अलर्टचा इशारा दिला असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. मे महिन्यातील तापमान आधीचे सर्व रेकार्ड मोडीत नवीन उच्चांक गाठत असल्याने त्याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे. उन्हाचे चटके सहन होत नसल्याने दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे.त्यामुळे शहरातील रस्ते दुपारच्या वेळेस सामसुम असतात. वाढत्या तापमानाचा फटका शेती आणि मनरेगाच्या कामांना सुध्दा बसत आहे. शेतकरी पहाटेच शेतात पोहचून सकाळी १० वाजेपर्यंत शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करीत आहे. उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून डॉक्टर सुध्दा शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा व भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत आहे.
कमी विद्युत दाबाची समस्या
४पारा ४५ अंशावर पोहचल्याने उकाडा प्रचंड वाढला असून त्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिक कुलर, पंखे आणि एसीचा आधार घेत आहेत. परिणामी विजेच्या मागणीत अचानक वाढ झाली असून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी कुलर,पंखे देखील काम करीत नसल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे. अनेक नागरिकांनी वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याची तक्रार केली. मात्र त्याचा सुध्दा काहीच परिणाम झाला नसल्याने शहरवासीयांची समस्या कायम आहे.
वेळापत्रकात बदल
४वाढत्या तापमानाचा दैनदिन कामावर परिणाम होत आहे.त्यामुळे तापमान पाहून कामाचे वेळापत्रक अनेकजण तयार करीत असल्याचे चित्र आहे. शेती, मनरेगा आणि घराचे बांधकाम शक्यतो सकाळीच सुरू करुन दुपारच्या वेळेत विश्रांती घेतली जात आहे.
शित पेयांची मागणी वाढली
४मे महिन्यातील तापमान उच्चांक गाठत असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक ताक, मठ्ठा, उसाचे रस आणि इतर शितपेयांचा आधार घेत आहे. त्यामुळे शितपेयांच्या मागणीत वाढ झाली असून या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
मागील सहा दिवसातील तापमान
४मागील शुक्रवारपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी ४३ अंश सेल्सिअस तर शनिवारी ४४, रविवारी ४४.४, सोमवारी ४४.८ आणि मंगळवारी ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुधवारी (दि.२९) पारा ४३.५ अंशावर गेला होता. त्यामुळे उकाडा कायम होता.