डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:43+5:302021-06-28T04:20:43+5:30
गोंदिया : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने आज, सोमवारपासून (दि. २८) सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या ...
गोंदिया : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने आज, सोमवारपासून (दि. २८) सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या स्तरात समाविष्ट करून निर्बंध लागू केलेे आहेत. याअंतर्गत आजपासून सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहेत, तर शनिवार आणि रविवार या वीकेंडला जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू राहणार आहेत.
कोरोनाच्या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच पूर्णपणे लॉकडाऊनची वेळ जनतेवर येऊ नये यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी डेल्टा प्लसचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ही वेळच येऊ न देण्यासाठी राज्य शासनाने सर्व जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज, सोमवारपासून केली जाणार आहे. यासंबंधीचे आदेशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यानुसार साेमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहतील, तर शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद आणि महसूल विभागाची पथकेसुद्धा कार्यान्वित राहणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
..............
आठवडी बाजाराचा आदेश दोन दिवसांतच रद्द
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि गुरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश काढले होते. मात्र, डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लागू झाल्याने हे आदेश रद्द करण्यात आले.
................
जिल्ह्यात डेल्टा प्लसच्या एकाही रुग्णाची नोंद नाही
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या डेल्टा प्लस या आजाराच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मात्र, या आजाराचा संसर्ग असलेल्या जिल्ह्यांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाची नजर आहे. डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील प्रवासी गोंदिया जिल्ह्यात आल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.