रेल्वेत रात्री दुसऱ्याची झोप खराब कराल तर खबरदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 04:48 PM2022-01-23T16:48:16+5:302022-01-23T17:52:22+5:30

बोगीमध्ये रात्री गोंगाट करणाऱ्यांना दंड आणि कारवाई रेल्वेतर्फे केली जाणार आहे. तसे नवे नियम रेल्वे मंत्रालयाकडून लागू करण्यात आले आहेत.

new rules have been implemented by the Ministry of Railways for passengers | रेल्वेत रात्री दुसऱ्याची झोप खराब कराल तर खबरदार !

रेल्वेत रात्री दुसऱ्याची झोप खराब कराल तर खबरदार !

Next
ठळक मुद्देनियम बदलले, सवय बदला रेल्वे विभागामार्फत होणार कारवाई

गोंदिया :रेल्वेतून रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या प्रवासात मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकत असाल किंवा मोठमोठ्याने गप्पा मारत असाल आणि त्यामुळे इतरांची झोप खराब होत असेल तर यापुढे कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

बोगीमध्ये रात्री गोंगाट करणाऱ्यांना दंड आणि कारवाई रेल्वेतर्फे केली जाणार आहे. तसे नवे नियम रेल्वे मंत्रालयाकडून लागू करण्यात आले आहेत. यासाठी प्रवाशांना आता आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. रात्री प्रवासादरम्यान काही प्रवासी सहप्रवाशांसोबत उद्धट वर्तन करतात. मोबाइलवर मोठमोठ्याने बोलतात. मोठ्या आवाजात गाणे ऐकत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. रेल्वेचे कर्मचारी गस्तीदरम्यान मोठ्या आवाजात बोलतात, अशादेखील तक्रारी होत्या. यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.

रात्री १० नंतरचे नवे नियम

- कोणताही प्रवासी मोठ्याने बोलू शकणार नाही किंवा मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणे ऐकू शकणार नाही.

- सहप्रवाशाला झोपेचा त्रास होऊ नये म्हणून रात्रीचे दिवे सोडून इतर सर्व दिवे बंद करावेच लागणार.

- सहप्रवाशांच्या तक्रारीवरून रेल्वे प्रशासन कारवाई करू शकते. यासाठी आपल्या सवयी बदलाव्या लागतील.

सुरू असलेल्या रेल्वे

गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस

मुंबई-हावडा एक्स्प्रेस

हटीया एक्स्प्रेस

अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस

जनशताब्दी एक्स्प्रेस

तक्रारींची तत्काळ दखल

काही प्रवासी मोबाइलवर मोठ्याने बोलतात. तसेच मोठ्या आवाजात गाणे ऐकतात. त्यामुळे सहप्रवाशांची झोप मोडते. यासंबंधी कुणाची तक्रार आल्यास त्याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई होऊ शकते.

रेल्वे पोलीस किंवा कर्मचाऱ्यांचाही गोंधळ चालणार नाही

रेल्वेच्या प्रवासादरम्यान रात्री रेल्वे पोलीस गस्तीवर असताना डब्यातच उभे राहून मोठमोठ्याने बोलतात. रेल्वे कर्मचाऱ्यांचाही गोंधळ त्या एक्स्प्रेसमध्ये दिसतो. आता त्यांचाही गोंधळ यात चालणार नाही.

रेल्वेतून प्रवासाकरिता स्वतंत्ररीत्या आरक्षण केले जाते. त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात. मात्र, रात्रीच्या वेळी मोबाइलवर किंवा आपसांत मोठ्याने बोलून झोपमोड करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यावर नव्या निर्णयामुळे चाप बसेल.

- सुनील अंबुले, आमगाव

लांबच्या प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर अनेक जण झोप घेणे पसंत करतात. मात्र, सहप्रवाशांकडून बोगीतील दिवे सुरू ठेवणे, मोबाइलवर मोठ्याने बोलणे सुरू असते. यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय योग्य आहे.

- डॉ. श्रीकांत राणा, आमगाव

Web Title: new rules have been implemented by the Ministry of Railways for passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे