नवीन चौकीमुळे वातावरण सुरक्षित
By admin | Published: February 18, 2017 01:01 AM2017-02-18T01:01:59+5:302017-02-18T01:01:59+5:30
शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती.
अग्रवाल : सावराटोलीत पोलीस चौकीचा शुभारंभ
गोंदिया : शेतकरी आणि व्यापारी यांची अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी ही मागणी होती. परिसरातील नागरिक, उत्पादित माल बाजारपेठेत आणणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये या चौकीमुळे सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवून व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी (दि.१७) सावराटोली येथील गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकीचा शुभारंभ आ.अग्रवाल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. आ.अग्रवाल यांनी फित कापून तंबूतील चौकीचा शुभारंभ केला. शुभारंभ केल्यानंतर चौकीला भेट दिल्याची पहिली नोंद जिल्हाधिकारी काळे यांनी केली. यावेळी ही सावराटोली पोलीस चौकी २४ तास सुरु असली पाहिजे, अशी अपेक्षा आ.अग्रवाल यांनी व्यक्त केली. तस९च पांढराबोडी व काटी येथेही पोलीस चौकी सुरु करण्यात येईल. गोंदिया शहराचे सिटी सर्व्हेक्षण झाल्यास गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया सिटी सर्वेच्या दृष्टीने नगर परिषद पुढाकार घेईल. वादाची सुरूवात ही जमिनीपासून होते. गोंदिया शहरात जमिनीच्या किमती सोन्यापेक्षा जास्त आहे.
राज्यातील सर्व जमीन मोजणीचा कार्यक्र म राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या १ मार्च रोजी शहरातील जागेच्या मोजणीच्या दृष्टीने बैठक घेण्यात येईल. पोलिसांनी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष इंगळे यांनी शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाला सहकार्य करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडू असेही सांगितले.
प्रास्ताविकातून डॉ.भुजबळ म्हणाले, गोंदिया शहरात देशाचे छोटे स्वरूप दिसून येते. सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. पोलीस चौकी उभारु न पोलीस केंद्राचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. सावराटोली परिसरात गुन्हेगारांचा वावर असल्याचे सांगितले जाते. ही गुन्हेगारी निश्चित आपण मोडीत काढू. या परिसरात सुरक्षितता व शांतता नांदण्यास या चौकीची मदत होणार आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावराटोली पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय गुरपुडे, पोलीस नाईक ओमेश्वर मेश्राम व संदीप नाईक यांना पुष्पगुच्छ देण्यात आले.
कार्यक्र माला कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शेतकरी, व्यापारी, नागरिक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
पोलीस क्वॉर्टरची कामे सुरू होणार
आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले, पोलीस चौकीच्या सुविधेमुळे धानाचा व्यापार येथे आणता येईल. भाजी मार्केटसुध्दा आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, स्टेट बँकेची शाखा येथे उघडण्यात येणार आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना रामनगर, सिटी पोलीस स्टेशन, रावणवाडी पोलीस स्टेशनच्या इमारती आणि १४४ पोलीस क्वॉर्टरची कामे येत्या सहा महिन्याच्या आत सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.