७ फेब्रुवारीपासून नवीन कार्यकाळ
By admin | Published: January 18, 2017 01:14 AM2017-01-18T01:14:43+5:302017-01-18T01:14:43+5:30
विद्यमान नगराध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ येत्या ६ फेबुवारी रोजी संपणार असून ७ फेब्रुवारी पासून नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचे नवे सत्र सुरू होणार आहे.
गोंदिया : विद्यमान नगराध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ येत्या ६ फेबुवारी रोजी संपणार असून ७ फेब्रुवारी पासून नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचितांना आणखी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे. विशेष म्हणजे नवनिवार्चित नगराध्यक्षांसह सदस्यांच्या पदग्रहणासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेची मागील निवडणूक डिसेंबर २०१२ मध्ये पार पडली होती. मात्र त्यांचा कार्यकाळ ६ फेब्रुवारी पासून सुरू झाला होता. त्यामुळे आता येत्या ६ फेब्रुवारी पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहणार असून त्यानंतर तो संपुष्टात येणार आहे. अशात ७ फेब्रुवारीपासून नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. त्यामुळे आता या सर्वांना येत्या ७ फेब्रुवारी पर्यंतची वाट बघावी लागणार आहे. मागील निवडणूक एका प्रभागातून चार सदस्य या पद्धतीने घेण्यात आली होती. तर नगराध्यक्षांची निवड ही सदस्यांतूनच करण्यात आली होती. यंदा मात्र शहरातील एक प्रभाग वाढवून घेत प्रभागातून दोन सदस्य या पद्धतीने ही निवडणूक झाली. तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आले. नगराध्यक्ष थेट निवडीचा हा दुसरा प्रयोग आहे. त्यामुळे यंदा ४२ सदस्यांसह नगराध्यक्षांची थेट निवडणूक झाली. या निवडणुकीचे निकाल ९ जानेवारी रोजी जाहीरही झालेत. मात्र विद्यमान अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी ७ तारखेची वाट बघावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)
पदग्रहण समारंभाची तयारी
यंदा निवडून आलेल्या नगराध्यक्ष व सदस्यांच्या पदग्रहणासाठी जाहीर समारंभाचे आयोजन केले जात असल्याची माहिती आहे. यात काही मंत्र्यांसह अन्य जनप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. मात्र या सर्वांच्या तारखा स्पष्ट होत नसल्याने या जाहीर समारंभाची नेमकी तारीख स्पष्ट नाही. त्यामुळे आता हा समारंभ कधी होतो हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.