नववर्षाचे सेलिब्रेशन जल्लोषात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2016 02:45 AM2016-01-01T02:45:41+5:302016-01-01T02:45:41+5:30
वर्षभरातील कडू-गोड आठवणींचा ठेवा जतन करून नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आणि नवीन आशांसह गोंदिया
वाहतूक पोलिसांनी केला रात्रीचा दिवस
४वाहतूक पोलीस म्हणताच हातात पावतीबुक घेऊन सिग्नल तोडला की, खिशाला कैची लावणारा व्यक्ती. अशीच वाहतूक पोलिसांची प्रतिमा वाहनचालकांच्या मनात असते. परंतु ही प्रतिमा मोडित काढीत काही चौकात वाहतूक पोलिसांनी सायंकाळपासून कुठेही अपघात घडू नये यासाठी पालकत्वाची भूमिका बजावली. वाहनचालकांचे लायसन्स किंवा कागदपत्रे न तपासता त्यांना हळू आणि व्यवस्थित वाहन चालविण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी पेट्रोलिंग करण्यासोबतच चौकाचौकात इमानदारीने ड्युटी बजावली. वाहनचालकांना ते ‘हॅपी न्यू ईयर’ म्हणून शुभेच्छाही देत होते.
गोंदिया : वर्षभरातील कडू-गोड आठवणींचा ठेवा जतन करून नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आणि नवीन आशांसह गोंदिया शहरात आणि जिल्ह्यात ‘नववर्ष २०१६’ चे आतिषबाजीसह केक कापून धडाक्यात स्वागत करण्यात आले. यात बालक आणि तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. तरुणींही यात मागे नव्हत्या. दुपारपासून सुरू झालेला हा माहौल रात्री १ वाजेपर्यंत सुरू होता.
गेल्या ८-१५ दिवसांपासून आखलेले ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचे बेत प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गुरूवारी दिवसभर सर्वांची तयारी सुरू होती. गोंदिया शहरातील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, एनएमडी कॉलेज, डीबी सायन्स कॉलेजसह शहरातील विविध महाविद्यालये, सुभाष गार्डन आदी ठिकाणी दिवसभर युवा वर्ग एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते. महाविद्यालयीन युवतींसह बहुतांश युवा वर्गाने शहरातील अनेक हॉटेल्समध्ये सायंकाळी नववर्ष स्वागतासाठी खास पार्टीचे आयोजन केल्याचे दिसत होते. तर काहींनी एखाद्याच्या खोलीवर, होस्टेलवर पार्टीचा माहौल बनविला होता. त्या ठिकाणी खास डिजेच्या तालावर थिरकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सोबतच तरुण वर्गासह ज्येष्ठांमध्येही ‘चिअर्स’चा माहौल जास्त प्रमाणात दिसत होता.
रात्री १२ च्या सुमारास शहरातील रिंग रोड, एमआयटी कॉलेज रोड, तिरोडा रोड, बालाघाट रोड या भागात बाईकर्स तरुणांचे स्टंटही पहायला मिळत होते. सुसाट वेगाने आणि आवाज करीत इकडून तिकडे बाईकवरून जाणारे युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. (जिल्हा प्रतिनिधी)
युवतींनीही केले स्वागत
४युवतींही न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये मागे नव्हत्या. युवतींनी टेरेसवर डी. जे. नाही पण घरातलीच अत्याधुनिक ध्वनीव्यवस्था केली होती. नवनवीन गीते लावून युवतींनी तुफान नृत्याचा फेर धरला. यात मुलींशिवाय इतरांना कुणालाही प्रवेश नव्हता. ‘कोल्ड ड्र्ंिक्स’ आणि ‘पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, दाबेली’ याशिवाय काही ठिकाणी कच्चा चिवडा आदी पदार्थांनी युवतींची पार्टी रंगली होती. रात्री बारापर्यंत युवती ध्वनीव्यवस्थेवर तुफान नृत्य करताना दिसत होते. अनेक युवतींनी आजच्या दिवस आम्हाला एकत्र मजा घेऊ द्या, अशी विनंती पालकांना करून खास परवानगी मिळविली होती. गर्ल्स होस्टेलमध्येही डिजेची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी मुलींनी होस्टेलमध्येच डिजेच्या तालावर नृत्य करुन आणि केक कापून नवीन वर्षाचे स्वागत केले, काही मुलींनी चेहऱ्यावर ‘२०१६’ चे पेंटिंग करून लक्ष वेधून घेतले.
‘शांताबाई’ने केली धूम
४‘फाईव्ह...फोर....थ्री....टू....वन!!!!’ घडाळ्यात बाराचा ठोका वाजला अन् गोंदियाच्या आसमंतात रंगीबेरंगी रंगांच्या फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ‘हॅप्पी न्यू ईयर’, ‘वेलकम- २०१६’ अशा शुभेच्छांनी शहरातील घरे, कॉलनी अन् वस्त्या दुमदुमून गेल्या. ‘सेलिब्रेशन’ करत असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, उत्साह होता आणि अपेक्षा होत्या सुख, समृद्धी अन् भरभराटीच्या. रस्त्यांपासून ते गच्चीपर्यंत, बच्चेकंपनीपासून ते ज्येष्ठापर्यंत आणि झोपडीपासून ते थेट हॉटेल्सपर्यंत सर्वांनीच आपापल्या परीने ‘सेलिब्रेशन’ केले. शहरातील चौकाचौकात, तरुणाईच्या कट्ट्यांवर दरवर्षी प्रमाणेच गर्दी दिसून आली. गुलाबी थंडीच्या सानिध्यात शहरातील सोसायटींमध्ये इमारतींच्या गच्चीवर कौटुंबिक ‘टेरेस पार्टी’ झाल्या. यात ‘शांताबाई... शांताबाई...’ या गाण्याची धूम सर्वत्र दिसून आली.
वाईन शॉपवर गर्दी, घरीच रंगमहाल
४थर्टी फर्स्ट म्हटले की तळीरामांचा माहौल काही औरच असतो. चिअर्स केल्याशिवाय नवीन वर्षाचे सेलिब्रेशन होतच नाही असा समज असणाऱ्यांंना आवार घालता यावा आणि मद्यच्या धुंदीत गाडी चालवून अपघात होऊ नये म्हणून पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम उघडली होती. त्यामुळे पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून बचावण्यासाठी तळीरामांनी घरीच रंगमहाल करण्याचा बेत आखला. त्यामुळे बिअर बार सोडून अनेकांनी वाईन शॉप गाठले. लगेचच अनेकांनी घराचा रस्ता धरला. यामुळे शहरातील सर्वच वाईन शॉपवर गुरूवारी कमालीची गर्दी दिसत होती.