नववर्षात युवकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा
By admin | Published: January 3, 2017 12:37 AM2017-01-03T00:37:22+5:302017-01-03T00:37:22+5:30
युवकांनी बार, डान्सबार, दारूभट्टीत न जाता पहिला घोट घेण्याचे टाळावे. व्यसनमुक्त राहून नववर्षाचे स्वागत
पालकमंत्री बडोले : व्यसनमुक्त पहाट २०१७ कार्यक्रमातून जनजागृती
गोंदिया : युवकांनी बार, डान्सबार, दारूभट्टीत न जाता पहिला घोट घेण्याचे टाळावे. व्यसनमुक्त राहून नववर्षाचे स्वागत करावे. नवीन वर्षाच्या प्रारंभी दारू पिणार नाही, असा संकल्प करावा. व्यसनमुक्त तरूण देशाचा मान उंचाविण्यासाठी निश्चितच मदत करतील. व्यसनमुक्त रहा व व्यसनमुक्त करा, हेच उद्दिष्ट असून दरवर्षी व्यसनमुक्त पहाट कार्यक्रम घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
व्यसनाधिनतेमुळे समाजापुढे येणाऱ्या किळसवाण्या चित्राला हटविण्यासाठी समाजमन व्यसनमुक्त करण्यासाठी, साधुसंतांचे विचार लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी तसेच चरित्रवान व व्यसनमुक्त पिढी तयार करण्यासाठी गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदियाद्वारे संचालित बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र कुडवा व राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त पहाट २०१७ कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने डॉ. देवाशिष चॅटर्जी, सामाजिक कार्यकर्ते करतासिंग खत्रीकई, प्रसाद रेशमे, राजस्थानचे सत्यप्रकाश मेहरा, मुक्तांगणचे प्रमुख पवन सावंत, जनार्दन ब्राह्मणकर, कल्पना बहेकार, प्राचार्य अनिता राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्यामराव बहेकार, माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण उपस्थित होते. या वेळी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार मॉडेल शाळा व राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. देवाशिष चॅटर्जी, नेकी की दिवार कार्यक्रम बजरंग दल, नि:शुल्क प्याऊ लावणारे सामाजिक कार्यकर्ते करतारसिंग खत्रीकई, युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करणारे सत्यप्रकाश मेहरा, मुक्तांगणचे प्रमुख पवन सावंत, उत्कृष्ट कर्मचारी जनार्दन ब्राह्मणकर यांचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
या वेळी हजारोंच्या संख्येत नागरिक नशामुक्त राहून उपस्थित होते. प्रास्ताविक विजय बाहेकर यांनी मांडले.
कार्यक्रमाचे संचालन शैलेश जैन यांनी केले. आभार गजानन गराडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रसंतांच्या विचारांची आवश्यकता
४नागपूर येथील सप्तखंजरीवादक तुषार सूर्यवंशी यांनी राष्ट्रसंतांचे विचार सांगत व्यसनमुक्ती व समाजप्रबोधन करून मनोरंजनात्मक कीर्तन सादर केले. भ्रष्टाचार, व्यभिचार, अन्याय, अत्याचार आदि सामाजिक समस्यांची माहिती सोप्या भाषेत दिली. सध्याची परिस्थिती बदलविण्यासाठी, सुसंस्कारित व चरित्रवान पिढी निर्माण करण्यासाठी देशाला राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.