प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:40 AM2017-10-26T00:40:23+5:302017-10-26T00:40:34+5:30
नेहमीच चर्चेत राहणाºया बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणखी एका नवजात बाळाचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नेहमीच चर्चेत राहणाºया बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणखी एका नवजात बाळाचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार सदर महिलेच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी डॉक्टरांविरोधात रोष व्यक्त केला. यामुळे रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिल्पा मकरेलवार रा. गोंदिया या महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. तिला प्रसूतीसाठी मंगळवारी सकाळी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला दुपारी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने तिच्या नातेवार्इंकानी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर पलक अग्रवाल यांनी पाच हजार रुपयांंची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे दिल्याशिवाय प्रसूती करणार नाही असा अट्टाहास धरल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान बाळाची पोटातच हालचाल सुरु झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. तेव्हा डॉ. पलक अग्रवाल यांनी शिल्पाला शस्त्रक्रिया गृहात नेले. शिल्पाने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
परंतु त्या बाळाचा मृत्यू झाला होता. याच डॉ. पलक अग्रवाल यांनी शिल्पाचे बाळ सुदृढ असल्याचे सांगितले होते. परंतु पैसे न दिल्यामुळे त्यांचे बाळ मृतावस्थेत हातात आल्याने नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच न.प.चे माजी उपाध्यक्ष पंकज यादव यांनी रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरला निलंबीत करण्याची मागणी केली. कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह नेणार नाही अशी भूमिका घेतल्याने रुग्णालय प्रशासनाने दोषी डॉक्टरला निलंबित केले.