नवजात बालके संसर्गाच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:10 AM2017-08-17T00:10:20+5:302017-08-17T00:14:16+5:30
उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील बालमृत्यूचा मुद्दा देशात गाजत आहे. गोंदियाचे गोरखपूर अनेकदा होत असते. गंगाबाईतील बालमृत्यू प्रकरण अनेकदा गाजले आहे.
गोंदिया : उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील बालमृत्यूचा मुद्दा देशात गाजत आहे. गोंदियाचे गोरखपूर अनेकदा होत असते. गंगाबाईतील बालमृत्यू प्रकरण अनेकदा गाजले आहे. पुन्हा तीच स्थिती गंगाबाईत निर्माण झाली आहे. आजघडीला गंगाबाई स्त्री रूग्णालयात असलेल्या दुर्गंधीमुळे येथील नवजात बालकांना व प्रसूती झालेल्या बाळंतिणींना संसर्ग होण्याची विदारक स्थिती या रूग्णालयात आहे.
जिल्ह्यात एकमेव असलेले स्त्री रूग्णालयात वर्षाकाठी ७ हजाराच्या घरात प्रसूती होतात. यात दिड हजाराच्या घरात शस्त्रक्रिया करून प्रसूती केली जाते. ७५ वर्षाची झालेली गंगाबाई मेडीकल कॉलेजच्या हस्तक्षेपामुळे मृत्यूशय्येवर आहे. मागील दिड वर्षापासून गोंदियात मेडीकल कॉलेज आल्याने केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचा कारभार पाहण्याची जबाबदारी मेडीकल कॉलेजचे वैद्यकिय अधिष्ठाता यांच्या मर्जीवर सोडण्यात आली. त्यांनी जो आदेश दिला त्या आदेशावर केटीएस व गंगाबाईचा कारभार चालविला जातो. परंतु वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या दुर्लक्षामुळे आज गंगाबाईत जन्माला येणाºया बालकांना व बाळंतिनींना संसर्गाचा धोका आहे. या गंगाबाईच्या चारही बाजूला घाणच-घाण पसरली आहे. गोंदिया शहरातील मोकाट डुकरे या गंगाबाईत सर्रास फिरतांना दिसतात. गंगाबाईतील ओपीडी असो, शस्त्रक्रिया गृह असो, कि शस्त्रक्रिया पश्चात कक्ष असो अश्या सर्वच कक्षाच्या जवळ डुकरांचा कळप गंगाबाईत दिसून येते. नवजात बाळांना किंवा प्रसूती झालेल्या महिलांना संसर्गाचा धोका होऊ नये यासाठी अत्यंत काळजी घेणे महत्वाचे आहे. परंतु गंगाबाईतील घाणच-घाण नवजात बाळांना किंवा शस्त्रक्रिया झालेल्या बाळंतिनीला संसर्ग होण्यासाठी पोषक वातावरण आहे. पावसाळ्याच्या दिवसात स्वाईन फ्ल्यूचेही रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात.
पावसाळ्याच्या दिवसात गंगाबाईत डुकरांचा मुक्त संचार असल्याने नवजात व बाळंतिनींना संसर्ग तर रूग्णांच्या नातेवाईकांना स्वाईन फ्ल्यू सारखे आजार होऊ शकतात. येथे स्वच्छता करण्याचा कंत्राट देण्यात आला तरीही येथे स्वच्छतेचा अभाव आहे. गंगाबाईकडे लक्ष द्यायला कुणीही नाही.
प्रसूती करण्यासाठी असलेल्या स्ट्रेचरवर आंथरण्यासाठी असलेले कापड धूतल्यानंतर ज्या ठिकाणी वाळवायला टाकले जाते. त्या ठिकाणीही डुकरांचा मुक्त संचार आहे. डुकरांवरील विषाणू त्या कापडांवर सहजरित्या बसतात. तेच कापड आॅपरेशनच्यावेळी आंथरल्याने बाळंतिनींना किंवा नवजात बालकांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.
उपहारगृहासमोर ग्राहकांच्या स्वागतासाठी डुकरे!
गंगाबाई स्त्री रूग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून उपहारगृह सुरू करण्यात आले. या उपहार गृहाजवळ असलेल्या घाणीमुळे येथे नास्ता किंवा भोजन करणाºया रूग्णांच्या नातेवाईकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उपहार गृहासमोर सतत डुकरे भटकत असतात. या उपहारगृहाच्या दारावरच ग्राहकांबरोबर डुकरेही टाकाऊ पदार्थावर ताव मारतात. गंगाबाईतील रूग्णांसोबत सालेल्या नातेवाईकांसाठी येथे उपहारगृह उघडण्यात आले. परंतु या उपहारगृहाच्या दर्शनीभागातच डुकरे ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी तत्पर असतात.
लाईटवर अवलंबून असते प्रसूती
कोट्यवधी रूपये खर्च करून केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयासाठी एक्सप्रेस फिडर बसविण्यात आले. परंतु या कोट्यवधी रूपयाचा काहीच फायदा झाला नाही. विद्युत पुरवठा बंद झाला तर एक्सप्रेस फिडर काम करीत नाही. आरोग्य संस्थेत २४ तास सात दिवस वीज व पाणी असणे गरजेचे आहे असे शासनाचेच धोरण असतानाही जिल्ह्यासाठी एकचमेव असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील डॉक्टरांना गंभीर महिलेची प्रसूती करता येत नाही. लाईट येण्याची प्रतिक्षा डॉक्टरांना करावी लागते. प्रसूती कक्ष आणि शस्त्रक्रिया कक्षातील जनरेटरही वर्षभरापासून बंदच आहे.