महाराष्ट्र एक्सप्रेसच्या बोगीत आढळली नवजात बालिका
By admin | Published: December 11, 2015 02:15 AM2015-12-11T02:15:51+5:302015-12-11T02:15:51+5:30
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसच्या जनरल बोगीत ८ डिसेंबरच्या रात्री एक नवजात बालिका आढळली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती बालिका सहा दिवसांची आहे.
गोंदिया : कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसच्या जनरल बोगीत ८ डिसेंबरच्या रात्री एक नवजात बालिका आढळली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती बालिका सहा दिवसांची आहे. कचरा उचलणाऱ्या मुलाची नजर रेल्वे बोगीच्या बर्थखाली ठेवलेल्या अनाथ शिशूवर पडली. त्याने तिला उचलून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर बालिकेला उपचारासाठी बाई गंगाबाई महिला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला अंजली असे नाव देण्यात आले आहे.
गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.यू. सिंह यांनी सांगितले की, ८ डिसेंबरला महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म-५ वर रात्री ८ वाजताच्या सुमारास आली. गाडी पूर्णत: रिकामी झाल्यावर रेल्वे स्थानक परिसरात कचरा उचलणे व ट्रेनच्या खाली बोगींमधून पाण्याच्या खाली बाटल्या जमा करण्यासाठी १५ वर्षीय शिवराम नामक अनाथ किशोर गाडीमध्ये चढला. दरम्यान साधारण बोगीत रिकाम्या पाण्याच्या बाटल्या जमा करताना अचानक एका बोगीच्या बर्थखाली त्याला बालकाच्या रडण्याची आवाज आला.
त्याने त्वरित त्या नवजात शिशूला उचलले व सरळ प्लॅटफॉर्म-३ वरील रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. रेल्वे पोलिसांनी तिला जिल्हा महिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नवजात बालिकेची माहिती देणाऱ्या शिवरामचे रेल्वे पोलिसांनी कौतुक केले. विशेष म्हणजे शिवरामसुद्धा अनाथ बालक आहे. रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ३१७ अन्वये गुन्हा दाखल केला. आता पोलीस सदर बालिकेच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)