पाच वर्षांपासून नऊ आयुर्वेदिक दवाखाने बंद
By admin | Published: May 28, 2017 12:06 AM2017-05-28T00:06:05+5:302017-05-28T00:06:05+5:30
गोंदिया जिल्ह्यात २७ आयुर्वेदीक दवाखाने व तीन आम्ल रूग्णालय जिल्ह्यात सुरू आहेत.
निधी झाला बंद: जि.प.ने चालविण्यास दिला नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात २७ आयुर्वेदीक दवाखाने व तीन आम्ल रूग्णालय जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र १३ वने अंतर्गत असलेले तीन आम्ल व सात आयुर्वेदीक असे ९ रूग्णालय मागीले चार ते पाच वर्षापासून बंद आहेत. निधी नसल्यामुळे हे दवाखाने बंद आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील सात आयुर्वेदीक दवाखाने व तीन आंग्ल दवाखाने बंद झाले आहेत. हे दवाखाने १३ वने या शिर्षांतर्गत सुरू होते. त्यांना वर्षाकाठी एक कोटी रूपयाची गरज होती. परंतु या शिर्षातंर्गत शासनाने निधी देणे बंद केल्यामुळे मागील तीन ते चार वर्षापासून हे दवाखाने बंद आहेत. गोंदिया तालुक्यातील मजीतपूर, पांगळी, गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा, सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, आमगाव तालुक्यातील अंजोरा ही सहा आयुर्वेदीक दवाखाने निधी अभावी बंद पडले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात २७ आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. गोंदिया तालुक्यातील बनाथर, बटाणा, अदासी, चुटीया, धापेवाडा व मुर्दाळा असे सहा आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. गोरेगाव तालुक्यात घुमर्रा व तेढा येथे, आमगाव तालुक्यात शिवणी, ननसरी, गिरोला व कट्टीपार येथे, सालेकसा तालुक्यात पिपरीया, सोनपुरी, गांधीटोला येथे, देवरी तालुक्यात इडूकचुहा, डोंरगाव, पालांदूर, पुराडा येथे, सडक-अर्जुनी तालुक्यात मंदीटोला, कोसमतोंडी, बोपाबोडी, घाटबोरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ईळदा, बाराभाटी, बोंडगावदेवी, इटखेडा तर तिरोडा तालुक्यात अर्जुनी, गांगला, मुरमाडी व सरांडी येथे आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. आंग्ल दवाखाना आमगाव तालुक्यात चिचटोला, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झरपडा व सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथे असे एकूण तीन आंग्ल दवाखाने सुरू आहेत.
वन विभागाकडून निधी मिळत नाही
१३ वने या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आयुर्वेदीक दवाखान्यांना चालविण्यासाठी वर्षाकाठी एक कोटी रूपयाचा खर्च येत असल्याने हा खर्च करण्यात जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. वन विभागाकडून निधी मिळत नसल्यामुळे हे दवाखाने बंद आहेत.
दवाखान्यात ४८ डॉक्टर
जिल्ह्यातील आयुर्वेदिक दवाखान्यात ५२ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी ४८ डॉक्टर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यात २३ डॉक्टर स्थायी तर २८ डॉक्टर अस्थायी आहेत. चार जागा रिक्त आहेत.