सरपंचपदासाठी नऊ तर सदस्यपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात, गावागावांत तापले राजकारण
By कपिल केकत | Published: October 26, 2023 06:52 PM2023-10-26T18:52:52+5:302023-10-26T18:53:03+5:30
सरपंचपदाचे चार तर सदस्यांचे नऊ अर्ज घेतले मागे
कपिल केकत, गोंदिया: जिल्ह्यात चार ग्रामपंचायतसाठी होत असलेल्या सार्वत्रिक व १० ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. २५) सरपंचपदासाठीचे चार तर सदस्य पदांसाठीचे नऊ अर्ज मागे घेण्यात आले. यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सरपंचपदासाठी नऊ तर सदस्यपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे निवडणूक असलेल्या गावांमध्ये आता राजकारण तापू लागले असून उमेदवारांनी आपला जनसंपर्क सुरू केल्याचे दिसत आहे.
राज्यात कार्यकाळ संपलेल्या तसेच निधन, अपात्रता, राजीनामा आदीसह अन्य कारणांमुळे रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असून १० ग्रामपंचायतमध्ये फक्त सदस्यांसाठी पोटनिवडणुका घेतल्या जात आहेत. या अंतर्गत उमेदवारी अर्ज सादर करण्याचा टप्पा आटोपला असून बुधवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज मागे घ्यावयाचे होते. त्यात सरपंचपदासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांमधून सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम श्रीरामनगर येथे होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी एक तर सदस्य पदासाठीचे दोन अर्ज मागे घेण्यात आले. तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम येरंडी-देवलगाव येथून सरपंचपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी आलेले सहा अर्ज मागे घेण्यात आले. शिवाय, पोटनिवडणूक होत असलेल्या गावांमधून मात्र एकही अर्ज मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे आता सरपंचपदासाठी जिल्ह्यात एकूण नऊ तर सदस्यपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात उरले असून ते आपले भाग्य आजमावत आहेत.
उमेदवारांकडून भेटी-गाठी वाढल्या
- येत्या ५ तारखेला निवडणूक होणार असल्याने रिंगणात उरलेल्या उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये १० ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत फक्त सदस्यांसाठी निवडणूक होत असल्याने तेवढा जास्त जोर दिसत नाही. मात्र सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या चार ग्रामपंचायतमध्ये आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांकडून आपल्या मतदारांच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत.
आता होणार पार्ट्यांना सुरूवात
- मंगळवारपर्यंत नवरात्र होते व त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांना पार्टी द्यावी लागणार आहे. नवरात्र संपल्याने आता कार्यकर्ते व मतदारही काही ऐकून घेणार नाही. म्हणूनच, आता मतदारांसाठी पार्ट्यांना उधाण येणार आहे.
उमेदवारांची स्थिती दर्शविणारा तक्ता (सार्वत्रिक निवडणूक)
तालुका - अर्ज मागे - रिंगणातील उमेदवार (सदस्य) - अर्ज मागे - रिंगणातील उमेदवार (सरपंच)
- गोंदिया - ०० - १४ - ०० - ०२
- आमगाव - ०१ - १४ - ०० - ०२
- सडक -अर्जुनी - ०२ - १४ - ०१ - ०२
- अर्जुनी-मोरगाव - ०६ - १५- ०३ - ०३
-------------------------------------------
तालुका - अर्ज मागे - रिंगणातील उमेदवार (पोटनिवडणूक)
- देवरी - ०० - ०१
- आमगाव - ०० - ०२
- गोरेगाव - ०० - ०२
- तिरोडा - ०० - ०३
- सालेकसा - ०० - ०२
- अर्जुनी-मोरगाव - ०० - ००