आज लागणार नऊ लाख रोपटे
By admin | Published: July 1, 2016 01:41 AM2016-07-01T01:41:08+5:302016-07-01T01:41:08+5:30
राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला जात आहे. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ६१ हजार ६९० रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
सर्व विभाग सज्ज : १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचारी व नागरिक होणार सहभागी
गोंदिया : राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला जात आहे. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ६१ हजार ६९० रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. शुक्रवार, १ जुलै रोजी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षलागवडीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. यात १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
गोंदिया वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळ, नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि इतर यंत्रणा मिळून हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने दिला. त्यानुसार वन महोत्सव २०१६ अंतर्गत जिल्ह्यात ९ हजार ६१ हजार ६९० वृक्ष लागवड केली जाणार आहे. रोपट्यांना नर्सरीमधून वनपरिक्षेत्र कार्यालयात पोहोचविण्यात आले असून गेल्या चार दिवसांपासून रोपांचे वितरण विविध विभागांना केले जात आहे. गोंदिया तालुक्यासाठी कुडवा नाका परिसरातील वनपरिक्षेत्र कार्यालयातून रोपांचे वितरण सतत सुरू आहे. जवळपास सर्व वृक्षारोपणाच्या ठिकाणी हे रोपटे पोहोचविण्यात आले आहे.
या वृक्षारोपणासाठी वनविभाग गोंदियाला सर्वाधिक लक्ष्य देण्यात आले आहे. त्यांना ७ लाख ४८ हजार रोपांची लागवड करायची आहे. सामाजिक वनीकरण गोंदिया विभागाला २५ हजार रोपट्यांचे लक्ष्य आहे. तसेच वनविकास महामंडळाला ३१ हजार ८००, नवेगांव-नागझिरा वन्यजीव विभागाला २६ हजार ५९३, तसेच इतर यंत्रणांना १ लाख १५ हजार ९५० रोपटे लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. संबंधित विभागांनी त्यानुसार खड्डेही खोदले आहेत.
कोणी कुठून रोपटे घ्यायचे याचेही नियोजन आधीच करण्यात आले होते. त्यानुसार वनविभाग गोंदियाने मुरदोली आणि मालकनपूर येथील रोपवनातून ५०-५० हजार रोपटे उचलले. सामाजिक वनीकरण गोंदियाने कुडवा येथून २५ हजार, गोंडमोहाडी येथून २३ हजार ६७२, आमगाव तालुक्यातील किकरीपार येथून १७ हजार १८९, देवरी येथून ३ हजार ७६५, भागी येथून २३ हजार ६००, सडक अर्जुनी तालुक्याने १२ हजार ३०५, माहुरकुडा येथून ५ हजार ३८० आणि निमगांव रोपवन येथून ३१ हजार ७५० रुपये संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कृषि विभागाने हिवरा येथील कृषि फार्म मधून ३० हजार २१५ रोपटे उपलब्ध करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
माहिती कार्यालय व पत्रकारांचाही सहभाग
जिल्हा माहिती कार्यालय व पत्रकार बांधवांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीचा कार्यक्र म १ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता नवीन जिल्हा क्रीडा संकुलासमोर, पवार गुरूजी यांच्या फार्म हाऊस जवळ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आंबा, पेरु, जांभूळ, कदंब, निंब, गुलमोहर या जातीची २५ रोपटे लावण्यात येणार आहे. पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.
पावसाच्या हजेरी जीव पडला भांड्यात
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाखो रोपटे लावले जाणार असले तरी पाऊसच नसल्यामुळे हे रोपटे जगणार तरी कसे? असा प्रश्न गुरूवारी सायंकाळपर्यंत सर्वांना पडला होता. मात्र रात्री ८ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शुक्रवारी होणाऱ्या वृक्षारोपणातील झाडे किमान आठवडाभर तरी पाण्याशिवाय राहू शकतील, असा दिलासा मिळाला आहे.
३१८ सभांमधून जनजागृती
जिल्ह्यात हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ९ चित्ररथ काढण्यात आले. ९१ पथनाट्य आणि कलापथक कामी लावण्यात आले. तसेच ३१८ सभा घेऊन प्रचार-प्रसार करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.