नऊ महिन्यात पाडा जुना उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:22 PM2018-08-20T23:22:10+5:302018-08-20T23:22:45+5:30
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडण्यात यावा. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार सर्व खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडण्यात यावा. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार सर्व खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, या आशयाचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याची विश्वसनीय माहिती.
शहरातील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील उड्डाणपुलाचा भाग केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे बंद करण्यात यावा. पुलावरुन वाहतूक सुरू ठेवल्यास एखादी घटना घडल्यास याला रेल्वे विभाग जबाबदार राहणार नाही, असे पत्र यापूर्वीच रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडाभरापूर्वी जुन्या उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुला हाईट बॅरियर लावले. त्यामुळे जुन्या उड्डाणपुलावरुन सध्या कार, दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र रेल्वे विभाग अद्यापही यासाठी तयार नाही. आठ दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जुना उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आरखडा तयार करण्याचे निर्देश दिले. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा. ही सर्व कारवाही त्वरीत सुरू करण्यात यावी. याला विलंब केल्यास रेल्वे विभाग यासाठी जबाबदार राहणार नसल्याचे पत्रात म्हटल्याची माहिती आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र मिळताच त्यांनी उड्डाणपूल पाडण्यासाठी एजन्सींचा शोध घेतला. मात्र त्यांना यात यश आले नाही, त्यामुळे आता रेल्वेच जुना उड्डाणपूल पाडणार आहे. पूल पाडण्याचे काम अंत्यत कठीण असून यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होवू शकतो. त्यामुळे यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्याचेच नियोजन रेल्वे विभागाकडून सध्या सुरु आहे. रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी नऊ महिन्यांची डेडलाईन दिली आहे.
तसेच नवीन प्रस्तावित उड्डाणपुलाचा आरखडा तयार करण्यास सांगितले. त्यामुळेच पूल पाडण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
वाहतूक सुरू ठेवण्यास विरोध
रेल्वे विभागाच्या तांत्रिक अधिकाºयांनी शहरातील जुन्या उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर रेल्वे ट्रॅक भागातील पुलाची स्थिती फारच गंभीर आहे. त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावरुन हलकी व जड वाहनाची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी रेल्वे विभागाने केल्याची माहिती आहे.
नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक सुरू
शहरातील नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सदोष करण्यात आल्याने या पुुुलावरुन जडवाहतुक सुरू ठेवण्यात येवू नये. असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र यानंतरही नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक सुरू आहे. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकाराकडे संबंधित विभागाचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.