अंतर्गत मुल्यमापनासह नववीचे गुण लक्षात घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:56+5:302021-05-12T04:29:56+5:30
केशोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २०२० - २१ हे शैक्षणिक सत्र शिक्षणाविनाच कोरे राहिले. विद्यार्थ्यांचे हित जोपासून ...
केशोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २०२० - २१ हे शैक्षणिक सत्र शिक्षणाविनाच कोरे राहिले. विद्यार्थ्यांचे हित जोपासून राज्य परीक्षा मंडळाने दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार दहावीचा निकाल लावण्याचे धोरण निश्चित करावे लागले.
या पद्धतीमुळे हुशार आणि साधारण विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव नको आणि शाळेचा निकाल चांगला लावण्याच्या दृष्टीने शाळा स्तरावरून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सारखेच देण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे हुशार विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंतर्गत मूल्यमापन गुणांसह गतवर्षीच्या नववीचे गुण लक्षात घेऊन दहावी परीक्षा बोर्ड निकाल लावण्याची पद्धत अंमलात आणण्याची मागणी अर्जुनी - मोरगाव तालुका शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्राधान्याने विद्यार्थ्यांचे हित जोपासत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार राज्य परीक्षा मंडळाने दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शाळेविनाच कागदोपत्री दहावीचा निकाल कसा लावावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून गुण प्रदान करण्याचे शाळांना बोर्डाने निर्देश दिल्याने आता सर्वत्र हुशार आणि साधारण विद्यार्थ्यांना शाळेचा निकाल चांगला लावण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाची संधी मिळाल्यामुळे या प्रचलित पद्धतीने हुशार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तशी भीतीदेखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
.....
नववीच्या गुणांवर आधारित निकाल जाहीर करा
यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन गुणासह गतवर्षातील नववीची गुणपत्रिका बोर्डाने मागवून दहावीचा निकाल जाहीर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व विषय मिळून २०० गुणांचा एकत्रित एक पेपर घेण्याचा राज्य परीक्षा मंडळाचा विचार असून, जेव्हा तो पेपर होईल तत्पूर्वी नववीच्या गुणांवर आधारित दहावीचा निकाल घोषित करण्याची मागणी अर्जुनी - मोरगाव शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी शिक्षण मंत्र्यांना ऑनलाईन निवेदनातून केली आहे.