वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी धावले निसर्ग मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 09:09 PM2019-04-30T21:09:15+5:302019-04-30T21:09:52+5:30
वाढत्यामुळे तापमानाचा फटका मानवासह पशु पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. मात्र यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : वाढत्यामुळे तापमानाचा फटका मानवासह पशु पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. मात्र यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तळपत्या उन्हान्यात वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती करण्यासाठी गोरेगाव येथील निसर्ग मंडळाचे सदस्य वन विभागाच्या मदतीला धावून आले. त्यांनी गोरेगाव तालुक्यातील जंगलातील पानवठ्यांमध्ये पाणी भरुन वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थाबंविण्यासाठी पुढाकार घेतला.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलातंरण होत असते. दरवर्षी बौद्ध पोर्णिमेच्या रात्री पशुगणना होते. ही गणना केवळ जंगल भागातील असते. मागील वर्षी जंगल भागात ६३३ वन्यप्राणी आढळले होते. त्यात दोन बिबट, ११२ चितळ, ८ सांबर, ३३ निलगाय, १४१ रान डुक्कर, ८ अस्वल, ४ भेकर, ३६ मोर, ५ ससे, ३ लांडगे, ३ रानमांजर, २८० माकड अशा एकूण ६३३ वन्यप्राण्यांचा समावेश होता. प्राणी गणनेत उपलब्ध झालेल्या प्राण्यांच्या संख्येनुसार वनविभागाने उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जंगलात कृत्रिम १६ पानवठे तयार केले आहेत. मात्र हे पानवठे सध्यास्थितीत कोरडे पडले होते.त्यामुळे वन विभागाच्या मदतीने निसर्गमित्र मंडळाच्या सदस्यांनी या पानवठ्यांमध्ये टँकरव्दारे पाणी भरुन वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करुन दिले. तालुक्यातील बोळुंदा, पिंडकेपार, तेढा, गराडा, मुरदोली, सोंदलागोंदी, आसलपाणी, मलपुरी, बागळबंद, पठानटोला, निंबा या गावाच्या जवळपास तर कुठे लागूनच जंगल व्याप्त परिसर आहे. या भागात वन्य प्राण्यांसाठी १६ कृत्रिम पानवठे तयार केले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही वन्य प्राण्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. या पाणवंठ्यांची वनविभागाकडून दररोज पाहणी केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम. जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जंगलातील पाणवठ्यांचा शोध
वन्यप्राण्यासह स्वत:ची तहान भागविण्यासाठी होत असलेली धडपड व त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या वाढत्या घटना आणि वन्यप्राण्याच्या शिकारीच्या घटनांना पूर्णपणे पायबंद लागवा यासाठी निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने पुढाकार घेतला आहे. जंगलातील पाणवठे शोधून व त्या पाणवठ्याची साफसफाई करुन त्यात पाणी भरले.
यांनी घेतला पुढाकार
जंगलातील पानवठे स्वच्छ करुन त्यात वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी जाधव यांनी निसर्ग मंडळाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, सहसचिव दिलीप येळे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, सदस्य मोरेश्वर रहांगडाले, दिलीप चव्हाण, योगेश रहांगडाले यांनी सहकार्य केले.
गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीत दोन बांबू उभे करुन ठेवल्यास माकडांना पाणी पिण्याची अडचण होणार नाही. बांबुच्या सहाय्याने माकड विहिरीत उतरुन पाणी पिऊ शकतात. त्यामुळे निसर्ग मंडळाच्या टिमने या सामाजिक उपक्रमाला हातभार लावण्याची गरज आहे.
-एस.एम.जाधव वनपरिक्षेत्राधिकारी वनविभाग, गोरेगाव