नितीन बोरकर यांच्यामुळे उंचावली जिल्हावासीयांची मान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:51+5:302021-05-30T04:23:51+5:30
गोंदिया : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर, न्या. वीरेंद्रसिंग बिष्ट, न्या. मुकुलिका जवळकर व ...
गोंदिया : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर, न्या. वीरेंद्रसिंग बिष्ट, न्या. मुकुलिका जवळकर व न्या. नितीन बोरकर यांच्यामुळे नागपूर व गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नागपुरात जडणघडण झालेल्या या पाचही अतिरिक्त न्यायमूर्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे सेवेत कायम करण्यात आले आहे. त्यांचा शपथविधी हा १ जून रोजी मुंबई येथे होणार आहे.
न्या. नितीन बोरकर हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचे वडील रुद्रसेन बोरकर हेसुध्दा प्रसिध्द वकील आहेत. न्या. बोरकर यांनी आधी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तर, पुढे चालून नागपूरमध्ये अॅड. आर. बी.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केली. न्यायिक अधिकारी झाल्यानंतर त्यांनी विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये कार्य केले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते चंद्रपूरमध्ये प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना सेवेत कायम करण्यात आले आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी गौरवाची बाब आहे. न्या. बोरकर यांच्यामुळे जिल्हावासीयांची मान उंचावली आहे.