न.प.चे ४७ रोजंदारी कर्मचारी झाले स्थायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:01 AM2018-11-18T01:01:50+5:302018-11-18T01:02:06+5:30
येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे. त्यामुळे १९९३ पूर्वी नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
राज्य सरकारने नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील नगर परिषदेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. यामुळे गोंदिया नगर परिषदेतील वर्ग ३ चे २४ आणि वर्ग ४ चे २३ कर्मचाऱ्यांना स्थायी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषदेत १९९३ पूर्वी कार्यरत असलेल्या १७१ रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे.
यासाठी आ. अग्रवाल यांचा शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने फेब्रुवारी २०१८ मध्ये २३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयाचा लाभ गोंदियासह तिरोडा, तुमसर,भंडारा,पवनी नगर परिषदेच्या कर्मचाºयांना सुध्दा लाभ झाला होता. त्यानंतर आता ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी जहीरभाई अहमद व सुरेंद्र बन्सोड यांनी आ.अग्रवाल यांच्याच पाठपुराव्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून याबद्दल अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले.
विशेष म्हणजे यापूर्वी नगर परिषदेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना केवळ प्रती दिवस ६० ते ७० रुपये मजूरी मिळत होती. मात्र आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रती दिवस ४५० मजुरी दिली जात आहे.
याबद्दल दिलीप चाचेरे, नियाज भाई, किशोर उके, राजू भेलावे, किशोर वर्मा, उदय यादव, सुनील जोशी, राजेश शर्मा, योगेश वर्मा यांनी अग्रवाल यांचे आभार मानले.