अर्ज नाही, आता ‘दे धक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 09:00 PM2018-06-17T21:00:37+5:302018-06-17T21:00:37+5:30
शासन आपल्या समाजविरोधी धोरणांमुळे मच्छिमार बांधव व घुमंतू जातींवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरूद्ध घुमंतू मत्स्यमार बांधवांनी शहरात ‘दे धक्का’ मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शासन आपल्या समाजविरोधी धोरणांमुळे मच्छिमार बांधव व घुमंतू जातींवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरूद्ध घुमंतू मत्स्यमार बांधवांनी शहरात ‘दे धक्का’ मोर्चा काढला.
विदर्भात घुमंतू समाज विशेषत: मत्स्यमार समाज आपले न्याय्य हक्क व अधिकार मिळवून घेण्यासाठी सातत्याने आंदोलन करीत आहे. त्या माध्यमातून शासनाला निवेदने देवून आपल्या मागण्या ठेवत आहे. मागील काँग्रेस पक्षाच्या शासनाच्या विरूद्ध भारतीय जनता पक्षाने ‘अच्च्छे दिन’चे स्वप्न दाखवून एक कोटीपेक्षा अधिक घुमंतू व मत्स्यमार समाजातील लोकांना सोबत घेवून सत्ता स्थापित केली. परंतु सत्तेत येवून चार वर्षांचा कालखंड लोटल्यावरही या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. उलट त्यांना नष्ट करण्याचे षडयंत्र करीत आहे. यासाठीच घुमंतू, मत्स्यमार समाजविरोधी नितीच्या विरोधात गोरेगावात ‘दे धक्का’ मोर्चा काढण्यात आला.
मागण्यांमध्ये झिरो माईल नागपूर येथे असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार राहिलेले मत्स्य सहकार महर्षी जतिराम बर्वे यांच्याद्वारे निर्मित विदर्भ विभागीय मत्स्यमार संघाच्या इमारतीला बेकायदेशिरपणे तोडण्यात आले. त्या इमारतीचे पुन्हा बांधकाम करण्यात यावे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्यात यावे. राज्यात लोकसंख्येच्या आधारावर आर्थिक तरतूद करण्यात यावी. ३० जून २०१७ च्या तलाव-जलाशयांशी संबंधित परिपत्रक मागे घेवून ते पूर्ववत करण्यात यावे. निलक्रांती योजनेत सुधार करून मत्स्यमार संस्थांना लक्षात ठेवून विशेष योजना बनविण्यात यावी. जिल्हा व तालुका स्तरावर घुमंतू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा देण्यात यावी, यांचा समावेश आहे.
मोर्चात प्रामुख्याने डॉ. योगेश दूधपचारे, जिल्हा संघटक परेश दुरूगवार, देविलाल घुमके, उमराव मांढरे यांनी मार्गदर्शन केले. शेवटी नायब तहसीलदार वेदी यांनी सभास्थळी येवून निवेदन स्वीकार केले. संचालन तालुका संयोजक कोमेश कांबळी यांनी केले. आभार सुंदरलाल लिल्हारे यांनी मानले.