लसीकरण न केल्यास सुविधांचा लाभ नाही ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:20 AM2021-06-21T04:20:26+5:302021-06-21T04:20:26+5:30
सडक-अर्जुनी : कोरोनाची लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत तालुक्यातील ...
सडक-अर्जुनी : कोरोनाची लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत तालुक्यातील ग्राम खोडशिवनी येथे गावकऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत जी व्यक्ती लस घेणार नाही त्या यापुढे शासकीय व अन्य सुविधांचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत गावातील ४५ वर्षे वयोगटाच्या लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गावातील कित्येक नागरिकांनी लस उपलब्ध असतानाही घेतली नसल्याचे दिसून आले. यामुळे गावात १०० टक्के लसीकरणात अडचण होत आहे. यावर १०० टक्के लसीकरण झाल्याशिवाय गाव पूर्णपणे सुरक्षित राहणार नसून लस न घेणारे वाहक म्हणून गावात राहतील व गावात कोरोना प्रादुर्भावाचा धोका राहणार. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हे दाखवून दिल्याबाबत समजावून सांगण्यात आले. गावाला व गावकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी १०० टक्के लसीकरण करणे गरजेचे असून, यासाठी सोमवारी (दि.२१) गावात आयोजित लसीकरण शिबिरात पात्र संपूर्ण लाभार्थ्यांनी लसीकरण करवून घेण्याचे ठरले. तसेच जो व्यक्ती लस घेणार नाही त्याला सरपंच, पोलीस पाटील व तलाठी दाखले देणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानदार रेशन देणार नाही असा निर्णय घेण्यात आला. सभेला सरपंच ऊर्मिला कंगाले, पोलीस पाटील भृंगराज परसुरामकर, उपसरपंच टेकाराम परसुरामकर, आरोग्य कर्मचारी झलके, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शिक्षक, स्वस्त धान्य दुकानदार तथा आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.