बोनसचा पत्ता नाही, शेतीच्या मशागतीचा खर्च करायचा कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:03+5:302021-06-19T04:20:03+5:30
बिरसी फाटा : महाविकास आघाडी सरकारने मागील खरीप हंगामात धानाला ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर केला होता. ...
बिरसी फाटा : महाविकास आघाडी सरकारने मागील खरीप हंगामात धानाला ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर केला होता. जिल्ह्यातील दीड लाखावर शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. मात्र अद्यापही बोनसची रक्कम न मिळाल्याने खरीप हंगामातील मशागतीचा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय हमीभाव केंद्रांवर अ ग्रेडच्या धानाला १८८८ रुपये, तर ब ग्रेडच्या धानाला १८६८ रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला. याशिवाय ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आधारभूत किंमत व बोनसची रक्कम मिळून शासकीय हमीभाव केंद्रांवर धान विक्री केल्याने शेतकऱ्यांना २५६८ रुपये दर मिळाला. मात्र पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही, धानाच्या बोनसची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता बोनससंदर्भात विचारपूस करण्यासाठी शेतकरी वारंवार खरेदी केंद्र व बँकांच्या चकरा मारत आहेत. पण त्यांना बोनसची रक्कम लवकरच मिळेल, असे सांगून परत पाठविले जात आहे.
........
खते, बियाणे खरेदीसाठी पैसे आणायचे कुठून?
अद्याप बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत. त्यामुळे खरिपातील पीक लागवडीसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मशागत, बी-बियाणे खरेदी, खते, कीटकनाशके, मजुरांची रोजी याकरिता पैशाची अडचण निर्माण होत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन धानाच्या बोनसची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली जात आहे.