ना कॉल ना ओटीपी तरी बँकेतून पैसे होताहेत गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:22+5:302021-06-19T04:20:22+5:30

गोंदिया : मेहनत न करता पैसे कमाविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. उल्लेखनीय ...

No call, no OTP, but money disappears from the bank | ना कॉल ना ओटीपी तरी बँकेतून पैसे होताहेत गायब

ना कॉल ना ओटीपी तरी बँकेतून पैसे होताहेत गायब

Next

गोंदिया : मेहनत न करता पैसे कमाविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, ना कॉल, ना ओटीपी तरी बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड करताना ‘ऑटो रीड ओटीपी’ परमिशनची परवानगी घेतली जात आहे. यामधूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापयर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहोत असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर तुमचे एटीएम कार्ड बंद होणार असे सांगून ते सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत. गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ९८ घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी २०१९ मध्ये ६५ प्रकरणे, तर गत पाच महिन्यांत सायबर माध्यमातून फसवणुकीचे गोंदिया जिल्ह्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

----------------------

पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच

यापूर्वी ओटीपी किंवा फोन कॉल करून ग्राहकांची फसवणूक केली जायची. त्यावेळीही पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच होती. अनेकदा फसवणूक करणारा इसम अनोळखी नंबरहून व प्रीपेड सीमकार्ड वापरून बोलायचा.

दुसऱ्या वेळी तो नंबर लावल्यास तो नंबर ‘आऊट ऑफ कव्हरेज एरिया’ किंवा ‘स्विच ऑफ’ असा दाखवितो. आताही तीच बाब घडत आहे. त्यामुळे पैसे एकदा गेले की ते मिळणे कठीण आहे.

------------------

- गोंदिया जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी ३० लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.

- यापेक्षा जास्त रकमेने अनेकांची फसवणूक झाल्याचेही ऐकिवात आहे; परंतु अनेकदा भीतीपोटी नागरिक समोर येत नाहीत.

- पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांतर्फे केले आहे.

-------------------------------

अनोळखी ॲप नकोच

- डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक ॲप्लिकेशन्स आली आहेत. हेच अप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नादात अनेक ग्राहक ‘सर्व टर्मस्‌ आणि सर्व कंडिशन्स अप्लाय’ करतात. त्यामध्येच ‘ऑटो ओटीपी रीड’ यालासुद्धा परवानगी देऊन टाकतात.

- अनोळखी ॲप डाऊनलोड केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. परिणामी आता स्वतः जागरूक होऊन नागरिकांनीच ‘अनोळखी ॲप नको रे बाबा’ अशी बाब म्हणण्यास सुरुवात केली आहे. फसवणुकीचे गुन्हेही अशाच ॲपमधून डेटा चोरी करून घडत आहेत.

---------------------------

कोट

नागरिकांनी अनोळखी फोन कॉल किंवा एसएमएसला प्रतिसाद देऊ नये, तसेच अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये. त्यावरूनच फसवणूक करणारे सहजरीत्या मोबाइल किंवा लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक संसाधनातील डेटा चोरी करतात. त्यामधूनच हे सर्व प्रकार घडत आहेत. कुठलीही तक्रार असल्यास पोलीस ठाण्यात तत्काळ तक्रार द्या. पोलीस त्याची त्वरित दखल घेतील.

-विश्व पानसरे,

जिल्हा पोलीस अधीक्षक, गोंदिया.

Web Title: No call, no OTP, but money disappears from the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.