दहा वर्षांपासून भरती नाही; भावी गुरुजींनी रस्त्यावर चहा विकायचा का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 09:13 PM2022-10-22T21:13:31+5:302022-10-22T21:14:29+5:30
शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. शासन शिक्षक भरती करण्यास उदासीन आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने अध्यापक, पदविका, पदवी पात्रताधारक बेरोजगारांचे जगणे मुश्कील झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय भरती बंद असल्यामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद केली आणि आता शाळा बंद करण्याचे नियोजन सुरू केले असल्यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य पणास लागले आहे. अनेक शाळांमध्ये पाच ते सात शिक्षकांची आवश्यकता आहे, त्या शाळेत केवळ दोन आणि तीन शिक्षक असल्याचे चित्र आहे.
शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. शासन शिक्षक भरती करण्यास उदासीन आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने अध्यापक, पदविका, पदवी पात्रताधारक बेरोजगारांचे जगणे मुश्कील झाले आहे. काय करावे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. पदवी घेऊन पदवी, पदविकाधारक बेरोजगारांनी काय करावे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा तसेच खासगी शाळेतील अनेक पदे रिक्त आहेत.
शेकडो शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत, त्यामुळे शिक्षकांची सुमारे हजारांवर पदे रिक्त आहेत. दहा वर्षांपासून भरती प्रक्रिया होत नसल्याने शिक्षक, अध्यापक, पदविका, पदवीधारकांनी आता रस्त्यावर चहा विकायचा का? असा संतप्त सवाल या डीटीएड, बीएड पात्रधारक बेरोजगार भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात आता केवळ ५ डीएड कॉलेज
- जिल्ह्यात डीएडची ८ कॉलेज होती. त्यापैकी तीन कॉलेज बंद झाली आहेत. आता जिल्ह्यात पाच डीएड कॉलेज आहेत. ११०० जागा एकूण आहेत.
दरवर्षी २५० शिक्षक बाहेर पडतात त्यांचे काय ?
शासनाच्या शिक्षण विभागाची भरती बंद असल्याने त्याचा परिणाम डीएड कॉलेजवर झाला आहे. त्यामुळे ७० टक्केच ॲडमिशन झाले आहे. नोकरी मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. दहा वर्षांपासून शिक्षक भरती नाही. त्यामुळे खासगी कॉन्व्हेंटवर अल्पशा मानधनावर डीएड झालेल्या भावी शिक्षकांना काम करावे लागते.
दहा वर्षांपासून भरती नाही
राज्यात २०१० नंतर शिक्षक भरती झाली नाही. २०१७ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत प्रक्रिया सुरू झाली; परंतु तीही अद्याप अपूर्ण आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेत मध्यंतरी घोळ झाला होता. त्यामुळे सुपेसह इतरांनाही अटक होऊन ती प्रक्रिया लांबलेली होती.
डीटीएड, बीएडधारकांची संख्या मोठी असून, शिक्षक पदभरती होत नसल्याने बेरोजगारीच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.
कोणी कंपनीत नोकरी करतो, तर कोणी हॉटेलात
दहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने पदवीधारक बेरोजगारांनी करावे काय, असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मिळेल ते काम करून ते पोट भरत आहे. कुणी खासगी कंपनीत नोकरीला आहे तर कोणी हॉटेलात काम करतो आहे तर अनेक भावी शिक्षक शेतात मजुरीला कामाला जात असल्याचे चित्र आहे.
मी २०१० मध्ये डीएड पास झालो; परंतु अद्यापही नोकरी मिळाली नाही. वय निघून जात आहे, त्यामुळे मिळेल ते काम करावे लागत आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे. शेतीत जाऊन शेतीची कामे आणि दूध वाटण्याचे काम करीत आहे.
- पंढरी पाल, (डीएड, उमेदवार)
दहा वर्षांपासून शिक्षक भरती नाही. हजारो जागा रिक्त आहेत. शासन डीएड, बीएडधारकांची भरती करत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. परिणामी कॉन्व्हेंटमध्ये चार हजार रुपये महिना पगारावर नोकरी सुरू आहे. त्यात काय होणार, तुम्हीच सांगा.
- पराग बनकर, (डीएड, उमेदवार)