निवडणूक भत्ता नाहीच
By admin | Published: July 30, 2015 01:37 AM2015-07-30T01:37:50+5:302015-07-30T01:37:50+5:30
संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन शिक्षकांना मिळाले नसल्याने सर्वांमध्ये असंतोष पसरला आहे.
शिक्षकांमध्ये संताप : आशेवर फिरले पाणी
काचेवानी : संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन शिक्षकांना मिळाले नसल्याने सर्वांमध्ये असंतोष पसरला आहे. जवळपास १ कोटी १० लाख रुपयांचे मानधन थकित असल्याचे सांगितले जात आहे.
पूर्वी शिक्षकांना या कामाचे मानधन दिले जात नव्हते. त्यामुळे शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता. त्यावर काही अधिकाऱ्यांनी यावेळी निवडणूक भत्ता (मानधन) रोख स्वरूपात मिळणार असल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात तसे झालेच नाही.
रोख स्वरूपात लगेच मानधन मिळेल या आशेने निवडणूक मतदान अधिकारी म्हणून मतदान केंद्रावर जाताना शिक्षकांसह इतर कर्मचारी खुशीचे होते. मतदानाच्या दिवशी शेवटपर्यंत भत्ता मिळणार असल्याची आशा त्यांनी ठेवली आली. शेवटी साहित्य जमा करताना आपल्याला भत्ता मिळणार अशी आशा सर्वांना होती. मात्र ती आशा निराशेत बदलले. शेवटी नाराज होवून शिक्षकांना खिशातील पैसे खर्च करुन परतावे लागले.
आश्चर्याची बाब अशी की, मतदान साहित्य शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या हाती सोपविताना निवडणूक भत्ता मिळणार असल्याचे चॉकलेट देण्यात आले होते. विशेष म्हणजे निवडणूक कामात असलेल्या शिक्षकांना महसूल कर्मचारी असभ्य वागणूक देतात, अपशब्दाचा वापर करतात. तसेच क्षुल्लक कारणाकरिता कारवाई करण्यात येईल, बरखास्त करण्यात येईल, निलंबित करण्यात येईल अशा धमक्या दिल्या जातात असा अनेक शिक्षकांचा अनुभव आहे. तरीही राष्ट्रीय कर्तव्य समजून शिक्षक या कामात सहभागी होतात.
निवडणूक भत्ता त्वरित देण्यात आला नाही तर यानंतरच्या निवडणुकांच्या कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. (वार्ताहर)
तरीही शिक्षकांनी
बाळगला संयम
महिनाभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांची याच मुद्द्यावरून उपविभागीय अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती. याचा राग शिक्षकांत होता. तरीपण शिक्षकांनी संयम बाळगला. साहित्य जमा करण्याच्या वेळी निवडणूक भत्यावरुन वादंग निर्माण झाला असता, मात्र त्याला थांबविण्यात काही शिक्षकांना यश आले.