अवजड वाहनांना शहरात नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 05:00 AM2020-12-31T05:00:00+5:302020-12-31T05:00:28+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सामान्य जनतेला धोका, गैरसोय, अडथळा निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब)(क) नुसार शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या जड व अवजड वाहनांना ज्या वाहनांची वहन क्षमता १२ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशी वाहने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पुढे नमूद केलेल्या मार्गावरुन व इतर तत्सम मार्गावरुन १ जानेवारी २०२१ पासून गोंदिया शहरात जड, अवजड वाहनांना प्रवेश राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि प्रशासनाने उशीरा का होईना आता पावले उचचली आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी १ जानेवारीपासून शहरात सकाळी ९ ते सायंकाळी ९ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सामान्य जनतेला धोका, गैरसोय, अडथळा निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब)(क) नुसार शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या जड व अवजड वाहनांना ज्या वाहनांची वहन क्षमता १२ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशी वाहने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पुढे नमूद केलेल्या मार्गावरुन व इतर तत्सम मार्गावरुन १ जानेवारी २०२१ पासून गोंदिया शहरात जड, अवजड वाहनांना प्रवेश राहणार आहे.बायपास रोडवरील पतंगा चौकपासून बालाघाटकडे जाणाऱ्या व पतंगा चौकपासून गोरेगावकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूस ५०० मीटरपर्यंत जड वाहनांना नो पार्कींग झोन ठेवण्यात आला आहे.
असा असेल वाहतुकीचा मार्ग
त्यानुसार कारंजा टी-पाईंटकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, पतंगा चौक ते फुलचूर मार्गे गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, राजाभोज चौक ते छोटा गोंदिया मार्गे गोंदिया शहराकडे येणारा रस्ता, मरारटोली जंक्शनकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, राणी अवंतीबाई चौक ते छोटा पाल चौककडे येणारा रस्ता. कुडवा नाका ते गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता. बायपास रोडवरील किसान चौक ते फुलचूर गावाकडे येणारा रस्ता, गोंदिया शहरातील मरारटोली बस स्थानकाच्या दिशेकडून जयस्तंभ चौकाकडे मोठ्या उड्डाण पुलावरुन जड, अवजड वाहनांना येण्यास सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी राहील. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्य सरकारी गोडावून रामनगर येथे माल घेवून येणाऱ्या जड,अवजड वाहनांना कुडवा नाका ते पालचौक मार्गे राज्य सरकारी गोडावून जाण्याकरीता दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत प्रवेश बंदीतून सूट देण्यात येत आहे. परंतु या वाहनांचा वेग हा ताशी २० कि.मी. पेक्षा जास्त राहणार नाही.
या वाहनांना असणार सूट
केंद्र शासन व राज्य शासन, गोंदिया नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा इतर महामंडळाच्या मालकीची शासकीय कामासाठी फिरणारी वाहने. अग्नीशमन दल, सैन्यदल तसेच केंद्र व राज्य शासनाचे पोलीस दलाची जड वाहने. केंद्र शासन,राज्य शासन, स्थानिक स्वराज्य, संस्था व महामंडळे यांचेद्वारे शासकीय कामात कायदेशिररित्या गुंतलेली खाजगी जड वाहने. दूध, पेट्रोल,डिझेल,केरोसीन, गॅस यासारख्या जीवनावश्यक वस्तूचा गोंदिया शहरात पुरवठा करणारी जड वाहने, प्रवाशी वाहतूक करणारी शासकीय, निमशासकीय तथा खाजगी वाहने यांना सूट देण्यात आली आहे. मात्र यासाठी त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे अणे आवश्यक आहे.