यानंतर कुठल्याही परीक्षा रद्द होणार नाहीत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:40+5:302021-06-16T04:38:40+5:30
गोंदिया : राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागात प्राध्यापकांची अनेक रिक्त पदे आहेत. ती पदे लवकरात लवकर भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर ...
गोंदिया : राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागात प्राध्यापकांची अनेक रिक्त पदे आहेत. ती पदे लवकरात लवकर भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर कार्यवाही सुरू आहे. येत्या काही दिवसात मान्यता प्राप्त करून रितसर पदभरती करण्यात येईल. कोरोनाच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून यानंतर कोणत्याही परीक्षा रद्द होणार नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (दि. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे मंगळवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदय सामंत म्हणाले, शिक्षण शुल्कासंदर्भात आलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. यानंतर उच्च व तंत्रनिकेतनच्या कुठल्याही परीक्षा रद्द होणार नाहीत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यातील शैक्षणिक सत्रास केव्हापासून सुरुवात करायची यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. कोरोनाचा गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा आदर्श संपूर्ण राज्याने घेऊन याचे अनुकरण करावे. प्रत्येकवेळी गोंदिया सकारात्मकतेकडे वाटचाल करते. आम्ही ८० टक्के समाजकारण, तर २० टक्के राजकारण करतो. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्याला मिळालेले ४ व्हेंटिलेटर्स गोंदियावासीयांच्या कामी येतील. दुसरी लाट ओसरू लागली असली तरी, तिसरी लाट कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकानेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व कोरोना संसर्ग काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करून मनोबल वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचसाठी हा दौरा आहे. याची सुरुवात पूर्व विदर्भापासून सुरू केल्याचे सामंत यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुकेश शिवहरे, सुरेंद्र नायडू उपस्थित होते.