शिवराज्याभिषेक कार्यक्रम साजरा करण्यासाठी ध्वज सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:06+5:302021-06-05T04:22:06+5:30
केशोरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून रोजी रायगडावर झालेला राज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेकाचे शुभ पाच चिन्हांनी अलंकृत ध्वज फडकवून ...
केशोरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून रोजी रायगडावर झालेला राज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेकाचे शुभ पाच चिन्हांनी अलंकृत ध्वज फडकवून साजरा करण्याचे आदेश राज्य शासनाने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयात साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या पंच शुभ चिन्हांनी अलंकृत असलेला ध्वज बाजारात उपलब्ध होत नसल्याने या परिसरातील ग्रामसेवक ध्वज मिळविण्यासाठी भटकंती करीत असल्याचे दिसून येते.
राज्य शासनाने पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या राज्यावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लॉकडाऊन घोषित करून संचारबंदीवर आळा घालण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठ प्रतिष्ठाने बंद आहेत. त्यामुळे पाच चिन्हांकीत ध्वज कुठून आणायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ध्वज मिळविण्यासाठी जिकडे-तिकडे विचारपूस करून शोध घेणे सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याची संकल्पना वा हेतू अत्यंत चांगला आहे. परंतु कोरोनाच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद आहेत. त्यामुळे ध्वज आणायचा कुठून, अशी गोची झाली आहे. वास्तविक पाच चिन्हांनी अलंकृत असलेले ध्वज शासनाने पुरविणे आवश्यक आहे. कारण जसा ध्वज पाहिजे आहे तसा मिळणे कठीण आहे. १५ फूट उंचीचा राजदंड लाल कापडाने गुंडाळलेला असणे गरजेचे आहे आणि भगव्या रंगाचा ध्वज आणि त्यावर पाच अंकित चिन्हे असलेला ध्वज पाहिजे असल्याचे शासन परिपत्रक नमूद करण्यात आले आहे. मात्र पाच शुभचिन्हांनी अलंकृत असलेला ध्वज बाजारात मिळणे कठीण असल्याचे सांगण्यात आले.