येरंडी गावात मोबाइल कव्हरेज मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:33 AM2021-03-01T04:33:04+5:302021-03-01T04:33:04+5:30
बाराभाटी : गेल्या अनेक दिवसांपासून देवलगाव परिसरात एका मोबाइल कंपनीचे टाॅवर उभारण्यात आले आहे. काही काळ हे टॉवर व्यवस्थित ...
बाराभाटी : गेल्या अनेक दिवसांपासून देवलगाव परिसरात एका मोबाइल कंपनीचे टाॅवर उभारण्यात आले आहे. काही काळ हे टॉवर व्यवस्थित चालत होते. मात्र मागील काही दिवसांपासून येरंडी गावात नेटवर्क राहत नसल्याने लाभार्थ्यांची फारच गैरसोय होत आहे. परिणामी परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहत आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळा, विद्यालय, शासकीय प्रशिक्षण संस्था व महाविद्यालय बंद होते. तर आता काही प्रमाणात सुरू झाले, पण या सत्रातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑनलाइन होत आहेत. अशा वेळेस परीक्षा या संगणक व स्मार्ट मोबाइलद्वारे द्याव्या लागत आहेत. येरंडी गावात मोबाइलचे नेटवर्क राहत नसल्याने परीक्षा सुरळीत देता येत नाहीत. या प्रकाराकडे मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी मोबाइल टॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. परिसरात मोबाइल टाॅवरची देखभाल व सुरळीत सेवा देण्याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही. टाॅवरचे मेन्टेनन्स चांगले व व्यवस्थित नाही. यामुळेच नेटवर्क राहत नसल्याचा आरोप मोबाइलधारकांनी केला आहे.
......
काही दिवसांपासून ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत, पण नेटवर्क राहत नसल्याने परीक्षा द्यायला फारच अडचण होत आहे.
- एम.आर. नंदागवळी, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थी
...
आधी कसे तरी कव्हरेज राहत होते, पण आता काहीच नेटवर्क नसल्याने इंटरनेट चालत नाही. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा देण्याची अडचण निर्माण झाली आहे.
- एस.बी. बोरकर, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी