ना नाव-ना पत्ता, फक्त ‘फाेन पे’ने लागला अपहरणाचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 05:00 AM2021-07-18T05:00:00+5:302021-07-18T05:00:07+5:30
आरोपीचे नाव, पत्ता व ओळख नाही अशात आरोपीपर्यंत पोहोचायचे कसे, हा प्रश्न पोलिसांना होता; परंतु रायपूरवरून गोंदियाला येताना आरोपीने रायपूर येथे एका दुकानातून टी-शर्ट खरेदी केले व पैसे ‘फोन पे’च्या माध्यमातून दिल्याचे प्रकाशने पोलिसांना सांगितले. यातून पोलिसांना आरोपीपर्यंत जाता आले. आरोपींवर भादंविच्या कलम ३६५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘त्या’ अल्पवयीन मुलीला राजस्थान व हरियाणात विक्री करण्याचा डाव होता; परंतु शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो डाव हाणून पाडला.
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एखाद्या घटनेतील आरोपीचे नाव व त्यांचा पत्ता पोलिसांना माहिती असेल तर त्याची शोधमोहीम पोलीस राबवू शकतात; परंतु एखाद्या घटनेतील आरोपीचे नाव, पत्ता व छायाचित्र नसल्यास आरोपींपर्यंत पोहोचायचे कसे, तो गुन्हा घडला किंवा नाही अशा संभ्रमात पोलीस होते; परंतु अशा एका प्रकरणाची उकल शहर पोलिसांनी केली असून, अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या ३ आरोपींना जेरबंद केले.
मध्यप्रदेश राज्यातील मंडला-कायखेडा येथील प्रकाश ग्यानी यादव (२१) याने मानिकपुरा-मंडला येथील एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे आणले. ते दोघेही पळून आल्यावर पोट भरण्यासाठी त्याला कामाची गरज असल्याने एका अनोळखी इसमाने त्या दोघांना काम देण्याच्या नावावर गोंदिया येथे चला, तुम्हाला काम मिळवून देतो म्हणून गोंदियात आणले; परंतु रेल्वेस्थानकावर उतरताच त्या मुलीला एका महिलेच्या स्वाधीन करून त्या दोघींना जाण्यास सांगितले. प्रकाश व तो अनोळखी पुरुष रेल्वेस्थानकावर थांबले. थोड्याच वेळात सामान आणतो म्हणून तो अनोळखी इसम निघून गेला आणि तो परतलाच नाही. खूप वेळ झाल्यावर कुणीच दिसत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजून प्रकाशने शहर पोलीस ठाणे गाठले.
शहर पोलिसांसोबत रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही फुटेज तपासले; परंतु त्यात कुणीच दिसत नसल्याने पोलिसांचा संशय सुरुवातीला प्रकाशवरच होता. प्रकाश योग्य वेळ सांगत नसल्यामुळे तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नव्हता. काही वेळाने योग्यवेळ लक्षात आली आणि फिर्यादी व आरोपी सीसीटीव्हीत दिसले. आरोपीचे नाव, पत्ता व ओळख नाही अशात आरोपीपर्यंत पोहोचायचे कसे, हा प्रश्न पोलिसांना होता; परंतु रायपूरवरून गोंदियाला येताना आरोपीने रायपूर येथे एका दुकानातून टी-शर्ट खरेदी केले व पैसे ‘फोन पे’च्या माध्यमातून दिल्याचे प्रकाशने पोलिसांना सांगितले. यातून पोलिसांना आरोपीपर्यंत जाता आले. आरोपींवर भादंविच्या कलम ३६५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘त्या’ अल्पवयीन मुलीला राजस्थान व हरियाणात विक्री करण्याचा डाव होता; परंतु शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो डाव हाणून पाडला. या प्रकरणातील आरोपींना पकडण्याची कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, प्रकाश गायधने, चौधरी, योगेश बिसेन, ओमप्रकाश मेश्राम यांनी केली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील घोटी येथे मिळाली मुलगी
आरोपी छन्नूलाल नागपुरे (४२, रा.घोटी, मध्यप्रदेश) याने टी-शर्ट घेण्यासाठी फोन-पे वरून पेमेंट केले होते. त्याच्याच घरी ही मुलगी आढळली, तर रायपूर येथे प्रकाशला मिळालेला अनोळखी पुरुष कोमलप्रसाद बागळे (३४, रा. किन्ही-खैरलांजी, मध्यप्रदेश) हा असल्याचे स्पष्ट झाले. गोंदिया रेल्वेस्थानकावरून ‘त्या’ मुलीला घोटी येथे पोहोचविणारी महिला गोंदियाच्या संजयनगरातील संगीता गोपाल यादव (३०) असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.