अनेक दिवसांपासून विजेचा बिघाडच सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:40+5:302021-05-10T04:28:40+5:30
बाराभाटी : अनेक महिने झाले, अनेक दिवसही लोटून गेले पण परिसरात विद्युत व्यवस्था अद्यापही सुरळीत झालेली नाही. असे म्हणताच ...
बाराभाटी : अनेक महिने झाले, अनेक दिवसही लोटून गेले पण परिसरात विद्युत व्यवस्था अद्यापही सुरळीत झालेली नाही. असे म्हणताच येत नाही, विद्युत विभाग काय करतो, अशा प्रकारची उत्तम सेवा देतो की ग्राहकांना अंधारात राहावे लागते. अनेकवेळा विनाकारण वीज बंद केली जाते, मात्र बिघाडच सापडतच नाही, असा शब्द अनेक दिवसांपासून व महिन्यांपासून वीज ग्राहक ऐकत आहेत.
मागील वर्षाच्या ऑगस्ट- सप्टेंबरपासून या भागातील विद्युत विभागाला बिघाड असा कसा सापडत नाही, याला जबाबदार कोण ? या विभागाचे अधिकारी व कर्मचारी या अशा कारणासाठी अनेक महिने लावत असणार तर ग्राहकांनी काय करावे, नेमकी अडचण सापडत नाही, तर सेवा कशी उत्तम होणार ? असा गंभीर प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहेत. खंडित वीज पुरवठ्याने अनेक ग्राहक संतापले आहेत, अर्जुनी मोरगावच्या अधिकारी व कर्मचारी आणि लाईनमनला विचारणा करण्यासाठी फोन केला तर मोबाईल बंद, कव्हरेज बाहेर तर फोन उचलत नाही. विद्युत विभागाकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. दिवसभरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. मागील वर्षभरापासून हीच समस्या कायम आहे. मात्र अद्यापही वीज वितरण कंपनीला बिघाड सापडला नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भागाला ३३ केेव्हीचे सबस्टेशन असूनही अडचण आहे, देवरी, अर्जुनी मोरगावकडून आलेली वीज सुरळीत का राहत नाही काही कळेना. जिल्हा विद्युत अधीक्षक अभियंता गोंदिया व कार्यकारी अभियंता देवरी यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मात्र याचा फटका वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. बिघाडाच्या नावाखाली १७ तास, १२ तास, रात्रभर, दिवसभर वीज बंद केली जाते, तरी सुद्धा बिघाडच सापडत नाही. त्यामुळे याची तक्रार ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पालकमंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल पटेल, सुनील मेंढे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे बोळदे, कवठा, येरंडी-देवलगाव, सुकळी, खैरी, डोंगरगाव येथील गावकऱ्यांनी केली आहे.
--------------------
दोन दिवसांपासून नळाचे पाणी नाही
मागील दोन दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामपंचायतचे नळांना पाणी पुरवठा केला नाही, वीज राहिली तरी नळाचे पाणी टाकीत पुरेसे पाणी भरुन ठेवत नाही. आता चक्क दोन दिवसांपासून नळांना अजिबात पाणी आलेच नाही, कोरोनाची समस्या, विजेची समस्या आणि ही नळांची समस्या आहे, कित्येक समस्यांना तोंड देऊन नागरिक सुध्दा आता त्रस्त झाले आहे.