यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्तावच मागविले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:03+5:302021-09-06T04:33:03+5:30
गोंदिया : जिल्हा परिषदेंतर्गत दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. परंतु यंदा प्राथमिक किंवा ...
गोंदिया : जिल्हा परिषदेंतर्गत दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. परंतु यंदा प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षकांना आदर्श पुरस्कार देण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रस्तावच मागितले नसल्याने जिल्हा परिषदेचा अजब कारभार पुढे आला आहे.
दरवर्षी जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा व गोंदिया या आठही तालुक्यातून प्राथमिक विभागातील प्रत्येक तालुक्यातून एक तर माध्यमिक विभागातून प्रत्येक तालुक्यातून एक अशा १६ शिक्षकांना आदर्श पुरस्कार दिला जातो. त्यासाठी एक महिना अगोदर त्यांचे प्रस्ताव मागितले जातात. परंतु यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांकडून जिल्हा परिषदेने प्रस्तावच मागितले नाही. शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे यंदा शिक्षक आदर्श शिक्षक या पुरस्कारापासून मुकले आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम यांच्याशी संपर्क केला असता यंदा शिक्षकांकडून प्रस्तावच मागितले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
............
शिक्षक गौरव सप्ताह साजरा होणार
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यक्त करतात. सद्य:स्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरू करता आलेल्या नाहीत. तरीदेखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समूह मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाकडून २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘थँक अ टीचर’ अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यासाठी १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाइन, ऑफलाइन स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे.