आरटीपीसीआर चाचण्यांचे ना अहवाल, ना मोबाइलवर संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:24 AM2021-05-03T04:24:02+5:302021-05-03T04:24:02+5:30

गोंदिया : मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरातील विविध केंद्रांवर आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांना आठ दिवसांचा कालावधी लोटूनही अहवाल प्राप्त ...

No reports of RTPCR tests, no messages on mobile | आरटीपीसीआर चाचण्यांचे ना अहवाल, ना मोबाइलवर संदेश

आरटीपीसीआर चाचण्यांचे ना अहवाल, ना मोबाइलवर संदेश

Next

गोंदिया : मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरातील विविध केंद्रांवर आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांना आठ दिवसांचा कालावधी लोटूनही अहवाल प्राप्त होत नसून चाचणीनंतर मोबाइलवर पाठविले जाणारे संदेशदेखील बंद झाले आहेत. त्यामुळे कोरोना चाचणी करणारे नागरिक संभ्रमावस्थेत असून, आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याच तणावाखाली जगत आहेत. यामुळे कुटुंबीयसुद्धा अडचणीत आले असून, संसर्गात वाढ होण्याची शक्यता बळावली आहे.

गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात एकमेव स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत जिल्हाभरातून येणारे आरटीपीसीआर नमुने तपासणी केले जातात. मात्र या प्रयोगशाळेतील १४ कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने स्वॅब नमुने तपासणीवर त्याचा परिणाम झाला आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून स्वॅब नमुने तपासणीची गती अगदी संथ असून, पाच हजारांवर स्वॅब नमुने प्रलंबित आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रावरील घेतलेले आरटीपीसीआर स्वॅब नमुने मेडिकलच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. पण चाचणी केल्यानंतर आठ दिवसांचा कालावधी लोटूनही स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त होत नसल्याने चाचणी करणारे नागरिक तणावाखाली आहेत, तर अहवाल प्राप्त होईपर्यंत अनेकजण बरेदेखील हाेऊन जात असल्याचे चित्र आहे. गोंदिया शहरच नव्हे सातही तालुक्यात हेच चित्र आहे. याप्रकरणामुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री नवाब मलिक यांना यासंदर्भात विचारले असते त्यांनी लवकरच व्यवस्था सुरळीत होईल, असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांची समस्या कायम आहे.

..............

मोबाइलवर संदेश येणे झाले बंद

आरटीपीसीआर चाचणी अहवालाला तर विलंब होतच आहे. त्यातच चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल संबंधितांच्या मोबाइलवर पाठविला जात होता. मात्र आठ दिवसांपासून संदेश पाठविणाऱ्या एनआयसीच्या सर्व्हरमध्ये बिघाड आला आहे. त्यामुळे मोबाइलवर संदेश येणेसुद्धा बंद झाले आहे. सर्व्हर दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होणार हे मात्र कळण्यास मार्ग नाही.

.............

आता चाचणी केंद्रावरच मिळणार अहवाल

गोंदिया शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून चार ठिकाणी आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर तपासणी करणाऱ्या आठ आठ दिवस अहवाल मिळत नसल्याची ओरड आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आता या केंद्रावर अहवाल उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

......

कोट

स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेतील कर्मचारी कोरोनाबाधित आल्याने स्वॅब नमुने तपासणीवर परिणाम झाला होता. मात्र आता कर्मचारी रुजू होत असून, येत्या चार-पाच दिवसात ही समस्या पूर्णपणे मार्गी लागेल. एकही स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रलंबित राहणार नाही.

Web Title: No reports of RTPCR tests, no messages on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.