ना शाळा, ना परीक्षा, अडीच लाखांवर विद्यार्थी झाले पास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:00 AM2021-06-23T05:00:00+5:302021-06-23T05:00:02+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद होत्याच. पण पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. पण अनेक पालकांनी संसर्ग लक्षात घेता आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ही अल्पच होती. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरलेच नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मागील दीड वर्षापासून शाळेचे आणि शिक्षकांचेसुद्धा दर्शन झालेच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दीड वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंदच होत्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे ना परीक्षा, ना चाचणी होताच पहिली ते बारावीपर्यंतचे जिल्ह्यातील अडीच लाखांवर विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्ष विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांना सदैव स्मरणात राहील.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद होत्याच. पण पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. पण अनेक पालकांनी संसर्ग लक्षात घेता आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ही अल्पच होती. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरलेच नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मागील दीड वर्षापासून शाळेचे आणि शिक्षकांचेसुद्धा दर्शन झालेच नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०४९, अनुदानित ३४५ आणि विनाअनुदानित २४५ शाळा आहेत. या शाळांमध्ये अडीच लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्ष कोरोनामुळे तसेच गेले. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. हा उपक्रम शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरत असल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून उत्तीर्ण केले जाणार आहे.
शहर आणि गावात असे होते शिक्षण
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा कमी आणि नुकसान अधिक झाले आहे. शहरी भागात सर्व सुविधा असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास केला. मात्र ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क आणि ॲन्ड्राॅइड मोबाइलची समस्या यामुळे गरीब विद्यार्थी अभ्यासापासून दूर राहिला. ऑनलाइन अभ्यासामुळे त्यांना बराच अभ्यासक्रम लक्षातदेखील आला नाही. त्यातच आता मागील वर्गातील अभ्यासक्रम समजला नसता पुढील वर्गात वर्गोन्नत केल्याने त्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होणार आहेत. तर अजूनही यंदा नवीन शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होते हे निश्चित सांगता येत नाही.
जिल्ह्यातील शाळांची संख्या
फायदे
- कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय तुटू नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्यात आल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला.
- ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळले, घरीच राहून शिक्षण घेता आल्याने कोरोना संसर्गाची भीती टळली.
- विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याचा स्कूल बसच्या खर्चाची बचत झाली.
- ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत झाली.
तोटे
- ऑनलाइन शिक्षणाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला. परिस्थिती बिकट असतानादेखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महागडे मोबाइल घ्यावे लागले.
- ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कची समस्या असल्याने विद्यार्थ्यांना बरेचदा ऑनलाइन क्लासेसपासून वंचित राहावे लागले.
- ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने संगणक, मोबाइल समोर ठेवून पाहावे लागल्याने डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता बळावली. मोबाइल अभ्यास असल्याने विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा पाहिजे तसा वचक नव्हता, त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले.