टेन्शन नाही...वैनगंगा तहान भागविणार, उन्हाळा निघणार; एवढा पाणीसाठा

By कपिल केकत | Published: March 1, 2024 07:34 PM2024-03-01T19:34:56+5:302024-03-01T19:35:05+5:30

अवकाळी पावसामुळे लागला हातभार

No tension... Vainganga will quench thirst - summer will pass; So much water storage: Contributed due to unseasonal rains | टेन्शन नाही...वैनगंगा तहान भागविणार, उन्हाळा निघणार; एवढा पाणीसाठा

टेन्शन नाही...वैनगंगा तहान भागविणार, उन्हाळा निघणार; एवढा पाणीसाठा

गोंदिया: यंदा ऊन चांगले तापत असून फेब्रुवारीतच उन्हाने घाम फोडला. उन्हाळा म्हणताच शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो; मात्र वैनगंगा नदीला पुरेपूर पाणी असून १५ मेपर्यंत तरी शहराला पाणीपुरवठा करता येणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली आहे. यामुळे तोपर्यंत तरी टेन्शन नाही.... कारण, वैनगंगा नदी तहान भागविणार आहे.


शहराला तालुक्यातील ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यामुळेच वैनगंगेवरच शहरवासीयांची तहान अवलंबून आहे. एरवी वैनगंगा नदी पाण्याने भरून असते; मात्र उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. यामुळेच उन्हाळ्यात वैनगंगेतील पाण्याची पातळी म्हटल्यास एकदम धडकी भरते अशीच स्थिती असते. त्यातही आता मार्च महिना सुरू झाला असून पुढे उन्हाचा तडाखा वाढतच जाणार आहे. अशात पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीवर त्याचा परिणाम पडतो.

विशेष म्हणजे, सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नळांना एक वेळ पाणीपुरवठा होत असल्याने वैनगंगेतील पाण्याची पातळी कमी तर झाली नाही अशी धडकीही नागरिकांना भरली होती. अशात वैनगंगा नदीला पाणी असणे गरजेचे आहे. अन्यथा शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवणार यात शंका नाही; मात्र दिलासादायक बाब म्हणजे, वैनगंगेत आताही पुरेपूर पाणी असून येत्या १५ मेपर्यंत तरी पाणी पुरणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली. यामुळे शहरवासीयांना घाबरण्याचे कारण नसून वैनगंगा शहरवासीयांची तहान यंदाही उन्हाळ्यात भागविणार आहे.
--------------------
१५ मे नंतर भासू शकते पाण्याची गरज

- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वैनगंगा नदीला चांगले पाणी असून १५ मे पर्यंत तरी पाण्याची गरज भासणार नाही; मात्र उन्हाळा बघता त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याची गरज भासू शकते अशी शक्यताही वर्तविली जात आहे; मात्र सध्या तरी पाणी असल्याने शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू आहे.
----------------------

सकाळी एकदाच पाणीपुरवठा
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पूर्वी शहराला सकाळ व सायंकाळी पाणीपुरवठा केला जात होता. मजिप्राकडून गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कटंगी व कुडवाला पाणीपुरवठा केला जातो. अशाप्रकारे मजिप्राचे सुमारे २५ हजार नळ कनेक्शन धारक आहेत; मात्र आता मजिप्राकडून शहराला फक्त सकाळीच पर्याप्त मात्रेत पाणीपुरवठा केला जात आहे.

---------------------------
- मजिप्राचे ग्राहक- सुमारे २५०००

- शहराला पाणीपुरवठा- ५ टाक्या
- ग्राम कुडवा- १ टाकी

- ग्राम कटंगी- १ टाकी

Web Title: No tension... Vainganga will quench thirst - summer will pass; So much water storage: Contributed due to unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.