जडवाहनांना शहरात प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 05:00 AM2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:11+5:30
शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बाजारपेठेतील रस्ते अरूंद असून त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या जडवाहनांचा दिवसभर शिरकाव होत असतो. परिणामी बाजारपेठेतील वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असून त्यात जडवाहनांचा शिरकाव नागरिकांसाठी त्रासदायक व तेवढाच धोकादायक ठरत आहे. जडवाहनांमुळे शहरात कित्येक अपघात घडले असून नागरिकांचा नाहक जीव गेल्याचे प्रकारही घडले आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी आता वाहतूक नियंत्रण शाखेने जडवाहनांना शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजता पर्यंत प्रवेशबंदी केली आहे. मंगळवारपासून (दि.२७) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बाजारपेठेतील रस्ते अरूंद असून त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या जडवाहनांचा दिवसभर शिरकाव होत असतो. परिणामी बाजारपेठेतील वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.
शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षीत ठेवण्याच्या दृष्टीने तसेच सामान्य जनतेला धोका, गैरसोय व अडथळा निर्माण होऊ नये यादृष्टीने वाहतूक नियंत्रण शाखेने जडवाहनांना शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत प्रवेशबंदीसाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता.
त्यास अधीक्षकांनी ग्रीनसिग्नल दिला असल्याने मंगळवारी (दि.२७) सकाळी ९ वाजतापासून शहरात जडवाहनांना प्रवेशबंदी केली जाणार आहे.
२ नोब्हेंबर पर्यंत प्रायोगीक तत्वावर
वाहतूक नियंत्रण शाखेचा हा प्रयोग २ ऑक्टोबर पर्यंत प्रायोगीक तत्वावर राबविला जाणार आहे. मात्र त्यानंतर कायमस्वरूपी अधिसूचना लागू करण्यात येणार आहे. मात्र तरिही या प्रयोगामुळे नागरिकांना काही अडचण होत असल्यास त्यांचे आक्षेप जाणून घेतले जाणार आहे. यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या मनोहर चौकातील कार्यालय तसेच पोलीस नियंत्रण कक्ष येथे लेखी स्वरूपात नागरिकांना आपले आक्षेप नोंदविता येणार आहेत.
या मार्गावर राहणार जडवाहनांना प्रवेशबंदी
कारंजा टी-पॉईंटकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.
पतंगा चौक ते फुलचूर शहराकडे येणारा मुख्य रस्ता.
राजाभोज चौक ते छोटा गोंदिया मार्गे गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.
मरारटोली जंक्शनकडून गोंदया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.
राणी अवंतीबाई चौक ते छोटा पाल चौककडे येणार मुख्य रस्ता.
कुडवा नाका ते पाल चौक कडे येणारा मुख्य रस्ता.
सिंधी स्कूल ते गोंदिया शहराकडे येणार मुख्य रस्ता.