नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
By admin | Published: March 2, 2017 12:10 AM2017-03-02T00:10:49+5:302017-03-02T00:10:49+5:30
नगरपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर सामावून घेण्याच्या अनुषंगाने नगरपंचायतीच्या सभेचा ठराव घेऊन
अर्जुनी-मोरगाव : नगरपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर सामावून घेण्याच्या अनुषंगाने नगरपंचायतीच्या सभेचा ठराव घेऊन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी बुधवार दि.१ पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. यासाठी नगरपंचायतीचा ढिसाळपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.
नवनिर्मित नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे समावेश करण्याबाबतचे धोरण शासनाच्या नगरविकास विभागाने निश्चित केले आहे. यासाठी १९ जानेवारी रोजी एक परिपत्रक काढण्यात आले. यात नगरपंचायतींच्या शासन मंजूर आकृतीबंधातील पदावर भुतपूर्व ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याची कार्यपध्दती अनुसरण्यात आली. त्यानुसार कार्यरत कर्मचाऱ्यांचे समावेशनासाठी नगरपंचायतीचा ठराव घेणे आवश्यक आहे. शासनाचा हा आदेश निघून एक महिन्याचा कालावधी लोटला मात्र स्थानिक नगर पंचायत पदाधिकाऱ्यांनी अद्याप ठराव घेतलेला नाही. ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर पात्र भूतपूर्व कर्मचारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणातील अतिरीक्त कर्मचारी यांच्या नेमणूका करून नगरपंचायतीचा कारभार चालविण्याचे धोरण आहे. आवश्यकता असल्यास नवीन पदभरती करण्याचे परिपत्रकातीलन नमूद आहे. मात्र स्थानिक नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रश्न अंधातरी आहे. इतर तालुक्याच्या नगरपंचायतींनी ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचे ऐकीवात आहे.
नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी खा. नाना पटोले यांच्या जनता दरबारात ही समस्या त्यांचे समोर मांडली. त्यांनी नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे यांना तातडीने ठराव घेऊन समस्या दूर करण्यास सांगितले. मात्र वृत्त लिहेस्तोवर स्थानिक नगरपंचायतीने ठराव घेतला नसल्याने हे काम बंद आंदोलन सुरूच आहे. या प्रकारामुळे नगर पंचायत प्रशासनातर्फे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच करवसुली, स्वच्छता, दिवाबत्ती सुविधा दाखले हे प्रश्न ऐरणीवर आहेत. (तालुका प्रतिनिधी)